गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात भाव खाणाऱ्या तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांना आता उतरती कळा लागलेली आहे. तंत्रशिक्षण अभ्यासक्रम चालवणाऱ्या संस्था बंद पडू लागल्या असून पुण्यात या वर्षी ८ ते १० व्यवस्थापन अभ्यासक्रम संस्थांनी वर्ग बंद केले आहेत. मात्र, त्याच वेळी विद्यार्थी मिळत नसतानाही आपले महाविद्यालय वाचवण्यासाठी नवे नवे अभ्यासक्रम सुरू करण्याची शिक्षण संस्थांची हौस काही फिटलेली नाही. पुण्यात या वर्षी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या जागांमध्ये साधारण ४ हजारांची वाढ झाली आहे.
तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाला (अभियांत्रिकी, औषधनिर्माण, व्यवस्थापन, स्थापत्यशास्त्र) विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कमी होत चालला आहे. राज्यात तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाची सर्वाधिक महाविद्यालये पुण्यात आहेत. पुण्यातील महाविद्यालयांनाही आता उतरती कळा लागली आहे. व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांनी आपले वर्ग बंद करण्यास सुरुवात केली आहे. पुण्यातील साधारण ८ ते १० महाविद्यालयांनी व्यवस्थापन अभ्यासक्रमाचे वर्ग बंद केले आहेत. पुण्यातील व्यवस्थापन अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता आता साधारण ६०० ने कमी झाली आहे. विद्यार्थी मिळत नसल्यामुळे अभ्यासक्रम बंद करण्याची वेळ महाविद्यालयांवर आली आहे.
जी अवस्था व्यवस्थापन अभ्यासक्रमांची आहे. तीच अवस्था अभियांत्रिकी महाविद्यालयांची आहे. राज्यातील सर्वाधिक म्हणजे ११८ अभियांत्रिकी महाविद्यालये ही पुणे विद्यापीठाशी संलग्न आहेत. अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्येही जवळपास पन्नास टक्के जागा रिक्त राहत आहेत. या महाविद्यालयांमधील सुविधांबाबतही अनेकदा आक्षेप घेण्यात आलेले आहेत. तरीही सध्या असलेली महाविद्यालये टिकवण्याचा आणि अभियांत्रिकी शाखेचेच नवे वर्ग सुरू करण्याचा संस्थाचालकांचा सोस मात्र काही कमी होताना दिसत नाही. गेल्या वर्षी प्रवेशक्षमतेच्या जवळपास पन्नास टक्के जागा रिक्त राहूनही या वर्षी पुण्यातील अभियांत्रिकी शाखेची प्रवेश क्षमता ही साधारण साडेतीन ते चार हजारांनी वाढली असल्याचे समोर येत आहे. अभियांत्रिकी शाखेबरोबरच व्यवस्थापन अभ्यासक्रमाचेही प्रवेश क्षमतेत वाढ करण्याचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत.
संस्थांचे राजकीय लागेबांधे
विद्यार्थी मिळत नसतानाही ज्या महाविद्यालयांना प्रवेश क्षमतेत वाढ करून देण्यात आली आहे, त्यापैकी बहुतेक महाविद्यालयाचे लागेबांधे हे राजकीय नेत्यांशी आहेत. काहींचे संस्थाचालकच राजकारणामध्ये सक्रिय आहेत.
बृहत् आराखडा नावापुरताच
राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांची परिस्थिती पाहता राज्याने नवी महाविद्यालये सुरू करण्यासाठी, प्रवेश क्षमता वाढवण्यासाठी बृहत् आराखडा तयार केला. मात्र, प्रत्यक्षात महाविद्यालये अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडून परस्पर परवानगी घेत असल्यामुळे राज्याचा बृहत् आराखडा हा नावापुरताच राहिला आहे.