वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून सामाजिक कार्य करणाऱ्या ठमाताई पवार यांना आणि पुणे विद्यापीठाच्या प्राणिशास्त्र विद्यापीठातील संशोधक डॉ. सरोज घासकडबी यांचा कीर्तन संजीवनी पुष्पलता रानडे पुरस्काराने रविवारी गौरविण्यात आले. प्रत्येकी दोन लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले आणि वीणा गवाणकर यांच्या उपस्थितीत सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल अरुणचंद्र कोंडेजकर यांना सेवागौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर, डायबेटिक असोसिएशन ऑफ इंडिया पुणे शाखा आणि महाराष्ट्र विद्या मंडळ या संस्थांना राजाभाऊ रानडे जन्मशताब्दीनिमित्त देणगी प्रदान करण्यात आली. ज्येष्ठ व्यवस्थापनतज्ज्ञ डॉ. प्र. चिं. शेजवलकर आणि सुरेश रानडे या वेळी उपस्थित होते.
मोरे म्हणाले, कीर्तनकार आपल्या कीर्तनातून समाजाला उपदेश करतात. पण, आपले आणि समाजाचे काही नाते आहे हे कित्येकदा ते विसरतात. पुष्पलता रानडे या त्याला अपवाद आहेत. स्त्री-पुरुष भेद विधायक पद्धतीने संपुष्टात आणण्याचे काम त्यांनी या पुरस्काराच्या माध्यमातून सिद्ध केले आहे.
गवाणकर म्हणाल्या, धाडस हे केवळ बंदूक हाती घेऊन येत नाही. तर, नवे विचार स्वीकारण्याचे सुद्धा धाडस असते. पात्रता असूनही पाश्चात्त्य देशातील अनेक महिलांना दुय्यम स्थानावर काम करावे लागले. कित्येकदा त्यांचे संशोधन दुसऱ्याच्या नावावर नोंदविले गेले. महिलांच्या बुद्धीचा उपयोग समाजहितासाठी झाला पाहिजे.
आपल्याच कोशामध्ये गुरफटले गेल्यामुळे मानसिक रुग्ण आणि अपंग यांच्या प्रश्नांकडे आपण सहानुभूतीपूर्वक पाहत नाही, या वास्तवावर बोट ठेवत गोडबोले यांनी त्यांच्याही आयुष्यात रंग भरण्याचे आवाहन केले. पुरस्कारविजेत्यांनी मनोगत व्यक्त केले. सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले.