गेल्या आठवड्यात पिंपळे सौदागर येथे प्रेम प्रकरणातून विराज विलास जगताप या वीस वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र, या प्रेम प्रकरणातील हत्येत मुलीला आरोपी करावं, अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. यावेळी त्यांनी पीडित कुटुंबाचं भेट घेऊन सांत्वन केले.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले की, “पिंपळे सौदागर येथे बौद्ध तरुणांची हत्या करण्यात आली. ही घटना गंभीर आहे. मराठा आणि दलित हे दोन समाज एकत्र आले पाहिजेत, अशी रिपब्लिकन पक्षाची भूमिका आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचंही हे स्वप्न होतं. जातीच्या नावावरून आपल्या मनात असलेली कटुता संपुष्टात आणली पाहिजे. समाज एक झाला पाहिजे. अशा पद्धतीची भूमिका डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांनी मांडली होती,” असं आठवले म्हणाले.

“तरुणाचा खून ही निंदनीय घटना असून, २० वर्षीय तरुणाचा बळी गेलेला आहे. जातीवादी मानसिकता समोर आलेली आहे. आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. मुलाच्या नातेवाईकांनी आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे. मुलीने फोनद्वारे मयत तरुणाला बोलवलं, मात्र त्या ठिकाणी ती नव्हती याची चौकशी पोलिसांनी करावी. तसेच संबंधित मुलीलाही आरोपी करावं,” अशी मागणी आठवले यांनी केली आहे.

मुलीच्या वडिलांसह सहा जण अटकेत

पिंपरी-चिंचवड शहरात प्रेमप्रकरणातून मुलीचे वडील, चुलते, सख्या आणि चुलत भावांनी मिळून तिच्या प्रियकराचा खून केल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतलं असून, यात दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. विराज विलास जगताप (वय-२०) असे खून करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी जितेश वसंत जगताप (वय-४४) यांनी फिर्याद दिली होती.