घरची अत्यंत हालाखीची परिस्थिती असताना रोहन ओमप्रकाश भालेराव या विद्यार्थ्यांने दहावीच्या परीक्षेत ६९ टक्के गुण संपादन करीत चांगले यश मिळवले आहे. विशेष म्हणजे त्याच्या आईने धुणीभांडी करुन त्याला शिक्षणं दिलं. त्यानंही आईच्या या कष्टाचं चीज करुन दाखवलं. भविष्यात देशसेवेसाठी लष्करात भरती व्हायची त्याची इच्छा आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील विठ्ठल नगर येथे रोहन आणि त्याचं कुटुंब राहतं. जवळच असणाऱ्या नेहरू नगर येथील शाळेत त्याने दहावीचे शिक्षण घेतलं. आपल्या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्याची त्याला जाण होती. त्यामुळेच कोणतीही खासगी शिकवणी त्याने लावली नाही. मिळेल त्या शालेय साहित्याचा अभ्यास करून त्याने दहावीचे शिक्षण पूर्ण केले आणि परीक्षेत चांगलं यश संपादन करून आईचं नाव उंचावलं.

आपल्या या यशाबद्दल सांगताना रोहन म्हणतो, “घरची परिस्थिती हालाखीची असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि दोन्ही मुलांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आई इतरांच्या घरी धुण्याभांड्याचं काम करते. महिन्याकाठी मिळणाऱ्या आठ-दहा हजार रुपयांमध्ये तारेवरची कसरत करीत ती आमचं कुटुंब चालवत आहे. भविष्यात मला लष्करात भरती होऊन देशसेवा करायची आहे.”

दरम्यान, लॉकडाऊनमुळं हातातलं काम गेलं असून इतर ठिकाणी काम मिळवण्याच्या प्रयत्नात असल्याचे रोहनच्या आईने सांगितले. लॉकडाउनमध्ये काम गेल्याने पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, सामाजिक संस्था वाटत असलेल्या जेवणावर उदरनिर्वाह केल्याचे त्यांनी सांगितले.