लढाऊ जहाज बांधणीत भारत आता सक्षम झाला असून पुढील आठवडय़ामध्ये संपूर्ण भारतीय बनावटीचे लढाऊ जहाज नौसेनेत दाखल होणार आहे. त्यामुळे भारतीय नौसेने महत्त्व जागतिक पातळीवर अधिक वाढले आहे, असे नौसेना प्रमुख अॅडमिरल डी. के. जोशी यांनी सोमवारी सांगितले.
पुणे विद्यापीठाच्या संरक्षण आणि सामाजिक शास्त्र विभागाने आयोजित केलेल्या जनरल बी. सी. जोशी स्मृती व्याख्यानमालेमध्ये अॅडमिरल जोशी बोलत होते. ‘राष्ट्रीय समृद्धीसाठी भारतीय नौसेना – समुद्र शक्ती’ या विषयावर अॅडमिरल जोशी यांनी आपले विचार व्यक्त केले. या वेळी लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल अशोक सिंग, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासूदेव गाडे, कुलसचिव डॉ. नरेंद्र कडू, संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभागाचे प्रमुख अरूण दळवी उपस्थित होते.
या वेळी अॅडमिरल जोशी म्हणाले, ‘‘संपूर्णपणे भारतीय बनावटीचे लढाऊ जहाजाच्या बांधणीचे काम कोची येथील बंदरात पूर्ण झाले असून हे जहाज आता भारतीय नौसेनेमध्ये दाखल होणार आहे. त्यामुळे नौसेनेचे महत्त्व अधिक वाढणार आहे. जगातील सागरी दळण-वळणाच्यादृष्टीने हिंदी महासागराला महत्त्व आहे. भारतातही आयात होणाऱ्या ९० टक्के वस्तू आणि ८० टक्के इंधन हे सागरी मार्गाने येते. त्यामुळे देशाला ७० टक्के परदेशी चलन मिळते. याचे संरक्षण भारतीय नौसेनाच करत आली आहे. हिंदी महासागर हा राजकीय आणि सामरिकदृष्टय़ा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे या भागात शांतता राखण्याचे कामही आम्ही करत आहोत.
मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सागरी सुरक्षेचे महत्त्व अधिक वाढले आहे. सागरी सुरक्षा अधिक कडक करण्यासाठी आणि नौसेना अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. भारताचे भविष्य हे सागरी सुरक्षेशी जोडले गेले आहे. भारताची वाटचाल आर्थिक महासत्ता होण्याकडे सुरू आहे. त्यामुळे सागरी सुरक्षेला अनन्यसाधारण महत्त्व आहे.’’
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 6, 2013 3:00 am