वाहतूक नियमांबाबत प्रबोधन करणाऱ्या प्रदर्शनास सुरुवात

पुण्यातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. बेशिस्तांकडून नियमभंगाचे प्रमाण वाढत असल्याने गंभीर तसेच किरकोळ स्वरूपाचे अपघात घडतात. पुण्यातील वाहतूक समस्या तसेच बेशिस्त वाहनचालक टीकेचे विषय ठरले आहेत. अभिनव कला महाविद्यालयात सुरू झालेल्या प्रदर्शनातूनही हीच बाब स्पष्ट झाली आहे.

भारतीय कला प्रसारिणी सभेचे अभिनव चित्रकला महाविद्यालय आणि वाहतूक पोलिसांकडून वाहतूक समस्येवर रेखाटलेल्या चित्रांचे प्रदर्शन सोमवारपासून खुले झाले. या प्रदर्शनात पुण्यातील वाहतूक समस्येवर भाष्य करणारी तसेच वाहतूक नियमांबाबत प्रबोधन करणारी साडेचारशे चित्रे मांडण्यात आली आहेत. प्रदर्शनातील चित्रे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची आहेत. चित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून नागरिकांचे प्रबोधन करण्यावर भर देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी चित्रांना चपखलपणे शीर्षकेही दिली आहेत. शीर्षकांमुळे ही चित्रे सामान्यांच्या नजरेत चटकन भरतात.

‘सेफ ड्राईव्ह, सेव्ह लाईफ’, ‘पादचाऱ्यांचे हक्क हिरावू नका, पादचाऱ्यांना मार्ग मोकळा करा’, ‘दारूची बाटली, मृत्यूची बातमी’, ‘रिक्षा आहे तिघांसाठी का भरता प्रवासी पैसे कमाविण्यासाठी’, ‘नका कोंबू मुलांना, जाब विचारा रिक्षावाल्या काकांना’, अशी शीर्षके चित्रांना देण्यात आली आहेत.

या प्रदर्शनाचे उद्घाटन पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांच्या हस्ते करण्यात आले. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत, वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते, अभिनव महाविद्यालयाचे प्राचार्य विलास चोरमले आदी या प्रसंगी उपस्थित होते. भारतीय कला प्रसारिणी सभेचे सचिव पुष्कराज पाठक पाठक यांनी उपस्थितांचे स्वागत केले. घोले रस्त्यावरील राजा रवि वर्मा कलादालनात बुधवापर्यंत (१३ फेब्रुवारी) सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत प्रदर्शन खुले राहणार आहे.

अपघात रोखण्यासाठी ‘पुणे पॅटर्न’

गेल्या वर्षीच्या तुलनेत पुणे शहरात यंदा प्राणांतिक अपघातांचे प्रमाण कमी झाले आहे. गंभीर स्वरूपाच्या अपघातात दुचाकीस्वार मृत्युमुखी पडतात. प्राणांतिक अपघात कमी करण्यासाठी पुणे पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान केल्याने गंभीर स्वरूपाच्या दुखापती होत नाहीत. शहरातील प्राणांतिक अपघातांचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पुण्यातील अपघात रोखण्यासाठी तयार करण्यात आलेला ‘पुणे पॅटर्न’ राज्यासाठी आदर्शवत ठरेल, असे पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी सांगितले.