उपचार घेणारी रुग्णसंख्याही लाखापर्यंत पोहोचण्याची शक्यता

पुणे : शहरातील करोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता ऑगस्ट महिन्याअखेपर्यंत शहरात तब्बल २ लाख रुग्ण आढळून येतील, असा अंदाज महापालिके कडून वर्तविण्यात आला आहे. ऑगस्ट महिन्यापर्यंत उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्याही लाखाच्या घरात पोहोचण्याची शक्यता आहे. वाढते रुग्ण लक्षात घेता शहरात जवळपास ८० हजार खाटा उपलब्ध कराव्या लागणार आहेत.

शहरातील रुग्णवाढीचा दर दुप्पट असून रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी नऊ दिवसांवर आला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आणि स्मार्ट सिटीने रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीचा अभ्यास करून ही शक्यता वर्तविली आहे. करोना चाचण्यांची संख्या वाढल्यामुळेही रुग्णसंख्येत मोठी वाढ होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

मार्च महिन्यापासून शहरात करोना विषाणूचा संसर्ग सुरू झाला आहे. प्रारंभी दाट लोकवस्ती आणि झोपडपट्टीपुरता मर्यादित असलेला करोना संसर्ग शहराच्या सर्वच भागांत आणि स्तरावर पोहोचला आहे. करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी महापालिके च्या स्तरावर विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या जात आहेत. मात्र जून महिन्यापासून शहरातील रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याचेही निदर्शनास आले आहे.  करोना चाचण्यांची संख्याही वाढविण्यात आल्यामुळे दररोज किमान १ हजार २०० च्या आसपास रुग्ण आढळून येत आहेत. मात्र आता ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

प्रारंभी महापालिके ने ३१ जुलैपर्यंत शहरात ५० हजार करोनबाधित रुग्ण असतील, असा अंदाज वर्तविला होता. सध्या शहरातील रुग्णांची संख्या ४५ हजार एवढी आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कमी झालेला कालावधी आणि वाढलेल्या चाचण्या या दाव्यावर ऑगस्टअखेपर्यंत दोन लाख रुग्ण असतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यामध्ये ९१ हजाराहून अधिक रुग्णांवर उपचार करावे लागणार आहेत. स्मार्ट सिटी आणि महापालिके च्या नव्या अंदाजानुसार ३१ जुलैअखेपर्यंत शहरात ६० हजार रुग्ण असतील. ऑगस्ट महिन्यात पहिल्या दोन आठवडय़ात ही संख्या लाखांचा टप्पा गाठेल. त्यानंतर उर्वरित पंधरा दिवसांमध्ये १ लाख रुग्णांची वाढ होईल, अशी शक्यता आहे.

तक्रारींची दखल

शहरातील रुग्णांवर महापालिके च्या रुग्णालयांबरोबरच खासगी रुग्णालयांमध्येही उपचार सुरू आहेत. वाढती संख्या लक्षात घेता जवळपास ८० हजार खाटा नव्याने उपलब्ध करून द्याव्या लागणार आहेत. सध्या रुग्णांना खाटा उपलब्ध नसल्याचे खासगी रुग्णालयांकडून सांगितले जात आहे. तशा तक्रारीही विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी आणि महापालिके च्या आरोग्य विभागाकडे करण्यात आल्या आहेत. खाटांची क्षमता वाढविण्याचे प्रयत्न सुरू असून करोना काळजी के ंद्रांसाठी महापालिके कडून शैक्षणिक संस्थांच्या जागा, वसतिगृह ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र मोठय़ा प्रमाणावर खाटा उपलब्ध करण्याचे आव्हान महापालिके च्या आरोग्य विभागापुढे राहणार आहे.

शहरात तीन मोठी करोना काळजी केंद्रे लवकरच

पुणे : शहरातील करोनाची वाढती रुग्णसंख्या आणि उपलब्ध खाटांची कमतरता लक्षात घेऊन तीन मोठी करोना काळजी केंद्र उभारण्यात येणार आहेत. त्याद्वारे २४०० खाटा नव्याने उपलब्ध होणार आहेत. तीनपैकी एक केंद्र १५ ऑगस्टपर्यंत, तर उर्वरित दोन केंद्र ऑगस्टअखेपर्यंत कार्यान्वित के ली जाणार आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्तालयाचे विशेष कार्य अधिकारी सौरभ राव यांनी सोमवारी दिली.

ऑगस्ट महिन्यात शहरातील वाढणाऱ्या रुग्णांची संख्या आणि उपलब्ध खाटा लक्षात घेता तीन मोठी करोना काळजी केंद्रे उभारावीत, असे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्य़ाचे पालकमंत्री अजित पवार यांनी सोमवारी विभागीय आयुक्तालयात घेतलेल्या बैठकीत दिले. बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत राव यांनी ही माहिती दिली.

राव म्हणाले, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात  १५ ऑगस्टपर्यंत ८०० खाटांचे करोना काळजी केंद्र सुरू होईल. त्याबाबतची निविदा मंजूर करण्यात आली असून येत्या दोन दिवसांत कार्यारंभ आदेश दिला जाईल. उर्वरित दोन करोना काळजी केंद्रांसाठी बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकु ल, सणस मैदान, सांगवीतील सार्वजनिक बांधकाम विभागाचे मैदान, श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कू लचे (एमएसपीएमएस) मैदान यांपैकी दोन ठिकाणे निश्चित के ली जातील. या तिन्ही ठिकाणी प्रत्येकी ६०० प्राणवायू आणि २०० अतिदक्षता व कृत्रिम श्वसन यंत्रणेच्या अशा एकू ण ८०० खाटा उपलब्ध होतील. म्हणजेच एकू ण तिन्ही के ंद्रांत मिळून २४०० खाटा उपलब्ध होईल.

लेखापरीक्षकांकडून तपासणी

करोना रुग्णांवर उपचार के ल्यानंतर खासगी रुग्णालयांकडून दिली जाणारी देयके  लेखापरीक्षकांकडून तपासून घेण्याचे आदेश पालकमंत्री पवार यांनी या वेळी दिले. शासनाच्या नियमानुसार उपचारांची दर आकारणी के ली वा कसे? याची शहानिशा करूनच रुग्णाला देयक दिले जावे, याबाबत यंत्रणेने दक्षता घ्यावी. तसेच शासकीय व खासगी वैद्यकीय महाविद्यालयांत एमबीबीएस, एमडी व शुश्रूषा (नर्सिग) अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षांत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना करोना उपचार सेवेत सामावून घेण्याचे आदेशही पवार यांनी या वेळी दिले.