वडगावशेरीचे आमदार बापू पठारे यांनी खराडी येथे शाळा, गेस्ट हाउस आणि बंगल्याचे बांधकाम अनधिकृतरीत्या केले असून या सर्व बेकायदा बांधकामांवर कारवाई करावी, अशी मागणी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी महापालिका आयुक्तांकडे केली. या भागातील सर्वसामान्यांना एक न्याय आणि आमदारांच्या बेकायदा बांधकामांना वेगळा न्याय असा प्रकार अधिकारी करत असल्याचीही तक्रार करण्यात आली आहे.
खराडी येथील सर्वेक्षण क्रमांक ८ व ९ येथील हे बेकायदा बांधकामाचे प्रकरण असून बंगल्याचे बांधकाम करताना आमदार पठारे यांनी एफएसआय देखील जादा वापरल्याची तक्रार आहे. या जागेत बांधलेली शाळा व गेस्ट हाउस पाडल्याशिवाय नवे बांधकाम करू नये, अशी अट घालूनच पठारे यांना नव्या बांधकामासाठी महापालिकेने परवानगी दिली होती. प्रत्यक्षात पठारे यांनी संबंधित दोन्ही इमारती न पाडता बेकायदा बांधकाम सुरू केले आहे. तसेच या भूखंडालगतच पठारे यांनी बंगला बांधला असून तो गुंठेवारीमध्ये आहे. हे बांधकामही नियमांचे पालन न करता झाल्याची तक्रार करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, युवा सेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आदी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन पठारे यांच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करावी, अशी मागणी केली. तसेच ही मागणी महापालिका प्रशासनाकडेही करण्यात आली आहे. वडगावशेरी परिसरात एक-दोन गुंठय़ांत छोटे घर बांधल्यास आमदार पठारे यांच्या सांगण्यावरून अधिकारी तातडीने सर्वसामान्यांवर कारवाई करतात. आमदारांनी केलेल्या बेकायदा बांधकामांवर मात्र कारवाई होत नाही, असाही आरोप या वेळी करण्यात आला.
या तक्रारीबाबत आमदार पठारे यांनी सांगितले, की मी कोणतेही बेकायदा बांधकाम केलेले नाही. जे बांधकाम सुरू आहे ते पूर्ण झाल्यानंतर शाळा व गेस्ट हाउस पाडले जाईल. ते सध्या पाडण्याची गरज नाही. मतदारसंघात माझे काम चांगले असल्यामुळेच सर्व विरोधक एकत्र येऊन आरोप करत आहेत. त्यात काही राष्ट्रवादीचेही गद्दार आहेत. मात्र, या आरोपांमध्ये तथ्य नाही.