जम्मू आणि काश्मीर येथील अनुच्छेद ३७० हटवण्यात आल्यानंतर ‘आम्ही पुणेकर’  या संस्थेच्या माध्यमातून डोडा जिल्ह्याती पाच शेतकरी पुणे जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले आहेत. यावेळी त्यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, आमच्या भागात तरुणाची संख्या अधिक आहे. पण त्यांच्या हाताला काम नसल्याने ते बेरोजगार आहेत. या तरुणाच्या हाताला रोजगार देण्यासाठी सरकारने प्रथम काम करावे. अशी मागणी यावेळी करण्यात आली.

जम्मू आणि काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं अनुच्छेद ३७० हटवण्यात आल्यानंतर आम्ही पुणेकर या संस्थेच्या माध्यमातून डोडा जिल्ह्यातील बलवंत सिंग, भवानीचंद बन्सीलाल, ओमप्रकाश मोदुलाल, दिनेशसिंग बेलीराम आणि हिंदभूषण बसंतराम हे पाच शेतकरी पुणे जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले. या दौऱ्याच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यात कशाप्रकारे शेती केली जाते?  त्या पार्श्वभूमीवर शेती विषयक काही संस्थाना भेट त्यांनी दिली आहे. यावेळी लोकसत्ता ऑनलाईनच्या प्रतिनिधीने त्यांच्याशी संवाद साधला.

डोडा जिल्ह्यामधील शेतकरी हिंदभूषण बसंतराम म्हणाले की, जम्मू आणि काश्मीरमध्ये अनुच्छेद ३७० रद्द करण्यापूर्वी आमच्या भागात सतत सैनिक असायचे. यामुळे काम करताना मर्यादा येत होत्या. आमच्या भागात कोणत्याही कंपन्या येण्यास तयार नव्हत्या. पदवीपर्यंतच शिक्षण असल्याने अनेक तरुण तेवढच शिक्षण घेऊन घरी बसून आहेत. तर काहीजण शेती करत आहेत. शिक्षण घेतलेल्या तरुणांना शेती  करताना पाहून वाईट वाटते. पण आता अनुच्छेद ३७० हटवण्यात आल्याने आमच्या भागात अनेक कंपन्या येतील आणि तरुणांना रोजगार मिळेल. विविध शैक्षणिक संस्था येतील. यामुळे  चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळण्यास मदत होणार आहे. आता आमच्या भागातील प्रत्येक तरुणास देशातील कोणत्याही राज्यात शैक्षणिक प्रवेशासाठी प्राधान्य दिले पाहिजे. यासाठी सरकारने एक पाऊल पुढे येण्याची गरज असल्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

तसेच ते पुढे म्हणाले की,  अनुच्छेद ३७० लागू असतानाच्या काळातील आमच्या भागातील कारभार खूप जवळून पाहिले आहे. पण आता अनुच्छेद ३७० हटवण्यात आल्याने आम्हाला जगण्याची नवी उमेद मिळाली आहे.  तसेच ते पुढे म्हणाले की, ज्या प्रकारे महाराष्ट्रात ऊसाचे पीक सर्वाधिक घेतले जाते. तर आमच्याकडे सफरचंदचे पीक घेतले जाते. तुमच्याकडे प्रत्येक पिकांबाबत काळजी किंवा त्यावर प्रक्रिया करण्यासाठी यंत्रणा आहे. तशी आमच्याकडे नाही. यामुळे जसा इतर पिकांना आमच्या इथे फटका बसतो. तसा सफरचंद पिकाची काळजी घेण्यासाठी प्रथम कोल्ड स्टोअर असणे जरुरीचे आहे. मात्र ही सुविधा फार कमी प्रमाणात आहे. यामुळे सफरचंदाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. त्यामुळे बाजारात किंमत देखील कमी मिळते. या पार्श्वभूमीवर सरकारने कोल्ड स्टोअर उभारावे आणि मार्केटिंग करण्यावर आधिक भर द्यावा. अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

आम्ही गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार

“ज्या पुण्यातून गणेशोत्सवास सुरुवात झाली आहे. याच उत्सव काळात आम्ही प्रथमच पुण्यात आलो आहे. त्यामुळे आता आम्ही सर्व मंडळी विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार” असेही त्यांनी स्पष्ट केले