सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उपलब्ध करून दिलेल्या मोफत वायफाय सुविधेचा वापर अद्याप बाल्यावस्थेतच आहे. सामाजिक शास्त्रांमध्ये पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून केलेल्या अभ्यासात थोडेच विद्यार्थी इंटरनेटवरील ई संसाधनांचा अभ्यासासाठी वापर करत असून, बहुसंख्य विद्यार्थी समाजमाध्यमांसाठीच वायफाय वापरत असल्याचे आढळून आले आहे.

विद्यापीठाने वीस वर्षांपूर्वीच प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांसाठी मोफत इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून दिली. २०१३-१४ मध्ये या यंत्रणेत बदल करून ऑप्टिकल फायबरच्या साहाय्याने विद्यापीठाच्या ४०० एकरांच्या आवारात वायफायच्या माध्यमातून मोफत इंटरनेट उपलब्ध करून देण्यात आले. विद्यापीठाच्या सेंटर फॉर सोशल सायन्सेस अँड ह्य़ूमॅनिटीजच्या अर्थसाहाय्याने इतिहास विभागातील सहायक प्राध्यापक डॉ. श्रद्धा कुंभोजकर यांनी पीएच.डी. संशोधक राहुल मगर आणि मानवशास्त्र विभागातील सहायक प्राध्यापक

डॉ. शंतनु ओझरकर यांच्या साहाय्याने अ‍ॅक्सेस डिनाइड कल्चरल कॅपिटल अ‍ॅन्ड डिजीटल अ‍ॅक्सेस हा संशोधन प्रकल्प पूर्ण केला. सामाजिक शास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासासाठी विद्यापीठाने पुरवलेल्या मोफत वायफाय सुविधेमुळे काही विशेष मदत होते किंवा नाही, या बाबत त्यांची मते त्यांनी प्रश्नावलीच्या माध्यमातून जाणून घेतली. त्याद्वारे हा निष्कर्ष समोर आला. हे संशोधनावर आधारित निबंध अर्जेटिनातील फुन्दासिओन मेन्तेक्लारा या संस्थेच्या नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे.

‘संशोधनानंतर इतिहास आणि मानवशास्त्र विभागातील या संशोधक प्राध्यापकांनी आपापल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या वायफाय यंत्रणेला जोडून घेणे कसे महत्त्वाचे आहे, या विषयी माहिती देण्यास सुरुवात केली आहे. विशेषत: नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना ई-मेल आणि व्हॉट्स अ‍ॅप समूहाच्या माध्यमातून संबंधित विषयाशी संबंधित संशोधनपर निबंध आणि अध्यापनासाठी वापरली जाणारी सादरीकरणे खुलेपणाने उपलब्ध करून दिली जाऊ लागली आहेत,’ असे डॉ. कुंभोजकर यांनी सांगितले.

विद्यापीठातील संशोधनाचा निष्कर्ष

संशोधनातील प्रमुख निष्कर्ष सामाजिक शास्त्र पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या ९९ टक्के विद्यार्थ्यांकडून मोबाइलद्वारे इंटरनेटचा वापर

६८ टक्के विद्यार्थ्यांकडून वायफायचा वापर

२० टक्के विद्यार्थ्यांकडे लॅपटॉप

६१ टक्के विद्यार्थ्यांकडून ई संसाधनांचा वापर

त्यात यूटय़ूब, विकीपीडिया, ई मेल, व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकचा वापर

एक तृतीयांश विद्यार्थ्यांकडून जेस्टोर, शोधगंगासारख्या संस्थांचा वापर

वायफाय सुविधा प्रवेशासह मिळण्याची विद्यार्थ्यांची अपेक्षा

वायफाय सुविधा सुलभ आणि जलद करण्याची गरज

ग्रामीण पार्श्वभूमी, भाषिक अडचणी असलेल्या विद्यार्थ्यांना वायफायसाठी नोंदणी करण्यात अडचणी

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे आवश्यक

सामाजिक शास्त्रांतील जेस्टोर सारखी संस्थळे मोफत नाहीत. या संस्थळांवरील लेख, संशोधन वाचण्यासाठी वर्गणी भरावी लागते. प्राध्यापकांच्या सल्लय़ानुसार विद्यापीठाने या संस्थळांची वर्गणी भरलेलीच आहे. मात्र, विद्यार्थ्यांकडून या संस्थळांचा तेवढय़ा

प्रमाणात वापर होत नसल्याने ही वर्गणी कारणी लागत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी इंटरनेटचा वापर कसा आणि का करावा, या बाबत प्राध्यापकांनी मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे.