तब्बल ४४ वर्षे गायन क्षेत्रात असलेल्या व विशिष्ट आवाज व शैलीमुळे रसिकांच्या पसंतीस उतरलेल्या ज्येष्ठ गायिका उषा उत्थुप यांनी आपल्या मनात बऱ्याच दिवसांपासून असलेली सल पुण्यात जाहीरपणे बोलून दाखवली. ‘दम मारो दम’ हे अतिशय गाजलेले गाणे आपल्याला मिळाले होते. त्यासाठी आपण पूर्ण तयारी केली होती, त्याची रंगीत तालीमही झाली. मात्र, ऐनवेळी ते गाणे माझ्याऐवजी आशाने गायले. याविषयी मी ‘पंचम’दाकडे विचारणा केली, तेव्हा ते गाणे गेले, असे त्यांच्याकडून सांगण्यात आल्याची आठवण त्यांनी सांगितली.
पुण्यात २७ मे ला यशवंतराव चव्हाण नाटय़गृहातील एका कार्यक्रमात सत्काराला उत्तर देताना उत्थुप यांनी आपला प्रवास थोडक्यात उलगडून सांगितला आणि मनातील ही खंतही व्यक्त केली. विशेष म्हणजे या समारंभात उपस्थित असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांनीही, हे गाणे उषानेच गायले असे आपल्याला आतापर्यंत वाटत होते, असे प्रांजळपणे नमूद केले. तेव्हा उषा म्हणाली, ते गाणे माझे होते. मात्र, ऐनवेळी ते माझ्याकडून आशाकडे गेले. अशाप्रकारे माझ्याकडील अनेक गाणी अन्यत्र गेली. मात्र, जी गाणी मिळाली, त्यातही आपल्याला समाधान आहे. ज्याप्रमाणे दाणे-दाणे पे खाने वाले का नाम लिखा होता है, असे म्हटले जाते. त्याच पध्दतीने, गाणे-गाणे पे गाणे वाले का नाम लिखा होता है, यावर आपला विश्वास आहे. त्यामुळेच ‘दम मारो दम’ हे गाणे गेल्यानंतर ‘हरे रामा हरे कृष्णा’ हे गीत माझ्याकडे आले होते, याकडे उषाने सर्वाचे लक्ष वेधले.
आपला जन्म मुंबईत झाला, आई पुण्याची. मुंबईत वाढलो असून आमचे पूर्ण कुटुंबच महाराष्ट्रीय असल्याप्रमाणे आहे. वय वर्षे ६५ असल्याचे सांगत गेल्या ४४ वर्षांपासून आपण गात आहोत. अनेक भाषांत विविध धाटणीची गाणी आपण गायली. हे पाहून वडिलांना आपला निश्चितच अभिमान वाटत असेल. सत्काराला उत्तर देताना खूप बोलायचे ठरवून आले होते. मात्र, प्रत्यक्षात वेळ आली तेव्हा सर्व विसरून गेले. मनातल्या मनात ट्राफिक जमा झाले. त्यामुळे शब्द पुढे सरकेना. मुंबईत जरी सर्व काही असले तरी पुण्यात घरी आल्यासारखे आहे. आगामी ‘खो-खो’ या चित्रपटातील ‘लाइफ इज खो-खो’ हे शीर्षकगीत खूपच हिट होईल, असा विश्वास व्यक्त करत रसिकांच्या प्रेमासाठी शेवटपर्यंत गात राहणार, अशी भावना उषाने व्यक्त केली होती.