News Flash

धोक्याची घंटा

महापालिकेत सत्ता, दोन खासदार, एक केंद्रीय मंत्री आणि आठ आमदार असे विधानसभा निवडणुकीपर्यंतचे चित्र होते.

(संग्रहित छायाचित्र)

|| अविनाश कवठेकर

घटलेले मताधिक्य, दोन जागी विजयासाठी संघर्ष करावा लागल्याने पालिका निवडणुकीसाठी भाजपसमोर आव्हान : – विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे घटलेले मताधिक्य आणि तीन मतदार संघात विजयासाठी करावा लागलेला संघर्ष पाहता अडीच वर्षांवर आलेल्या महापालिका निवडणुकीसाठी भाजपला धोक्याची घंटा वाजली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीवर मतदारांनी पुन्हा विश्वास दर्शविला आहे. वडगांवशेरी, हडपसर मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपकडून घेतले आहेत. त्यामुळे पालिकेत एकहाती सत्ता असलेल्या भाजपला विकासकामे करण्यावर भर द्यावा लागेल, असे पक्षाच्या खासदार, आमदारांनी सांगितले.

महापालिका निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत असून तब्बल भाजपचे ९८ नगरसेवक आहेत. महापालिकेत सत्ता, दोन खासदार, एक केंद्रीय मंत्री आणि आठ आमदार असे विधानसभा निवडणुकीपर्यंतचे चित्र होते. विधानसभा निवडणुकीत कसबा, कोथरूड, शिवाजीनगर, पर्वती, खडकवासला आणि पुणे कॅन्टोन्मेंट या सहा मतदारसंघात भाजपचे कमळ फुलले. हडपसर आणि वडगांव शेरी मतदार संघ मात्र भाजपला गमवावा लागला. सहा ठिकाणी विजय मिळाला असला, तरी शिवाजीनगर, खडकवासला आणि पुणे कॅन्टोन्मेंट या मतदार संघात भाजपला निसटती आघाडी मिळाली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी या मतदारसंघांत जोरदार लढत दिली. या मतदार संघात भाजपच्या नगरसेवकांची संख्या मोठी असतानाही भाजपला चांगले मताधिक्य घेता आलेले नाही.

कोथरूड, कसबा, शिवाजीनगर आणि पर्वती या मतदार संघात भाजपचे प्राबल्य आहे. तर वडगांव शेरी, हडपसर, खडकवासला आणि पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. विधानसभा निवडणुकीत दोन मतदारसंघात राष्ट्रवादीने विजय मिळविला असला असे दिसत असले, तरी पाकिलेतील महत्त्वाचे प्रभाग या मतदार संघात येतात. हे मतदार संघ भाजपच्या हातातून गेल्यास भाजपला सत्ता गमाविण्याची वेळ येऊ शकते. खडकवासला आणि पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघांत भाजप नगरसेवकांची संख्या मोठी असूनही राष्ट्रवादी व काँग्रेसने दिलेली लढत ही धोक्याची घंटा आहे. सर्वाधिक सुरक्षित मतदार संघ आणि बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या कोथरूड मतदार संघातून भाजपला अपेक्षित मतदान झालेले नाही. कोथरूडमध्ये मनसेचा एकही नगरसेवक नसताना मनसेकडून जोरदार लढत देण्यात आली. मनसेच्या उमेदवाराला भाजप विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला असला तरी ते या प्रचारात उतरले नाहीत. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने कोथरूडमधील प्रचारात सक्रिय सहभाग घेतला असता, तर मताधिक्य आणखी घटले असते.

निवडणुकीच्या निकालानंतर आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे. निवडणुकीत अति आत्मविश्वास नडल्याचे दिसून येते. मात्र महापालिका निवडणुकीसाठी या चुका टाळाव्या लागणार आहेत.  – माधुरी मिसाळ, शहराध्यक्ष, आमदार

महापालिका निवडणुकीसाठी धोक्याची घंटा आहे, असे म्हणता येणार नाही. पण निवडणुकीनंतर काही गोष्टींचा विचार निश्चितच करावा लागेल. यापुढे विकासकामे वेगात करावी लागतील. लोकांपर्यंत पोहोचावे लागेल. केवळ कामे करून भागणार नाही. संघटनात्मक ताकदीचा वापर करून लोकापर्यंतचा संपर्क वाढवावा लागेल. – गिरीश बापट, खासदार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2019 1:50 am

Web Title: vidhan sabha election low percentage voting akp 94
Next Stories
1 वाहनचालकांना वाहतूक पोलिसांची दिवाळी भेट!
2 राजकारणापलीकडचे आम्ही..
3 बंडखोरीमुळे २०१४ मध्ये जिंकलेल्या मनसेच्या एकमेव आमदाराचा यंदा पराभव
Just Now!
X