News Flash

बारामतीतील गावांची तहान भागवण्यासाठी विद्यार्थी पाणी पुरवणार!

बारामतीतील चार गावांची तहान भागवण्यासाठी पुण्यातील उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी एकत्र आले आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

बारामतीतील चार गावांची तहान भागवण्यासाठी पुण्यातील उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी एकत्र आले आहेत. उंदवडी केपी, उंदवडी सुपे, जराडवाडी आणि कारखेल या चार गावांना चाळीस दिवसांसाठी टँकरने पाणी पुरवण्याचे या विद्यार्थ्यांनी ठरवले आहे. प्रत्येक कुटुंबाला एका वेळी २०० लीटर पाणी मिळावे असे त्यांचे नियोजन आहे.
पुण्यातील २०-२५ विद्यार्थ्यांनी ‘तहान’ हा प्रकल्प सुरू केला असून, १ मे ते १० जूनपर्यंत तो राबवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. दररोज टँकरच्या ८ खेपा करून ४०० कुटुंबांना पाणी पुरवण्यात येईल, अशी माहिती हिमांशू खाचणे या विद्यार्थ्यांने दिली. हिमांशू म्हणाला, ‘बारामतीत पाण्याची कमतरता नाही असे सर्वाना वाटते, पण आम्ही प्रत्यक्ष सर्वेक्षण केले असता तिथल्या काही गावांना दर सहा दिवसांनी पाणी मिळत असल्याचे दिसले. पाण्याच्या कमतरतेमुळे काही कुटुंबांमध्ये रोज एकच जण अंघोळ करू शकतो असेही आढळले. बारामतीच्या काही गावांमध्ये काही लोक पाणी पुरवण्यासाठी काम करत आहेत. त्यांचे मार्गदर्शन आम्हाला मिळाले. तालुक्याच्या उत्तर भागातील १३ गावे आम्ही या प्रकल्पासाठी निश्चित केली. यातील ४ गावांपासून सुरुवात होणार असून, पुरेसा निधी जमल्यास प्रकल्पाची व्याप्ती वाढवू. आता विद्यार्थ्यांनी लोकसहभागातून एक ते दीड लाख रुपये जमवले आहेत. ५ मे पर्यंत जितका निधी जमेल त्यातून काम होईल.’ केवळ गावांनाच पाणी न पुरवता रस्त्यावरील स्थलांतरित कुटुंबांनाही पाणी देणार असल्याचेही त्याने सांगितले.
या प्रकल्पाचा एकूण खर्च ६ लाख रुपये आहे. प्रकल्प सध्या कोणत्याही सामाजिक संस्थेअंतर्गत नोंदणीकृत नाही, परंतु काही संस्थांनी त्यास मदत करण्याची तयारी दाखवली आहे. जमलेल्या निधीच्या वापराबाबत पडताळणी कशी होणार, अशी विचारणा केली असता हिमांशू म्हणाला, ‘गावातील सरपंच आणि टँकर चालक या दोघांकडे पाणीपुरवठय़ाच्या नोंदी केल्या जातील. आम्ही या प्रकल्पासाठी https://www.facebook.com/tahaanefforts हे फेसबुक पान सुरू केले असून त्यावरही माहिती टाकली जाणार आहे. आम्ही या गावांना अचानकपणे भेट देऊन खात्री करू. निधी देणारे लोकही अशाप्रकारे भेट देऊ शकतील. १५-२० दिवस पाणीपुरवठा केल्यानंतर सरपंचांकडून पत्र घेऊन त्याची प्रतही फेसबुकवर टाकू.’ अधिक माहितीसाठी संपर्क- हिमांशू- ८६००९६७७९९, रविना मोरे- ९०२११८१६०४.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 28, 2016 3:25 am

Web Title: villages provide students thirst water
Next Stories
1 शहरी भागातील विद्यार्थ्यांचा दुष्काळी दौरा
2 क्षमस्व… मजकूर उपलब्ध नाही…
3 सायकलपटू मित्राची स्मृती जपण्यासाठी..
Just Now!
X