बालभारतीच्या ‘व्हर्च्युअल   क्लासरूम’चे उद्घाटन

पुणे : ‘अभ्यासक्रमातील शिक्षणासह विविध विषयांतील तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळण्यासाठी, तुमच्यातील गुण विकसित करण्यासाठी व्हर्च्युअल   क्लासरूम उपयुक्त ठरणार आहे. एकदा वेळ काढून या माध्यमातून मला तुमचा गणिताचा वर्ग घ्यायला आवडेल. शिक्षण हे माझे पहिले प्रेम आहे, मला मुले आवडतात. तुम्ही देशाचे भविष्य आहात. त्यामुळे तुमचे भविष्य उज्ज्वल होण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करणार आहे,’ अशा शब्दांत शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी ‘व्हर्च्युअल   क्लासरूम’द्वारे राज्यभरातील विद्यार्थ्यांशी शुक्रवारी संवाद साधला.

‘बालभारती’ने ई बालभारती प्रकल्पांतर्गत निर्मिती केलेल्या ‘व्हर्च्युअल   क्लासरूम’चे आणि ‘बोलकी बालभारती’ या श्राव्य पुस्तकांचे उद्घाटन गायकवाड यांच्या हस्ते झाले. त्यानंतर नव्या सुविधेद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, शिक्षण संचालक दिनकर पाटील, राज्य मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे, बालभारतीचे संचालक विवेक गोसावी आदी या वेळी उपस्थित होते. राज्यभरातील ७२५ शाळांमध्ये व्हर्च्युअल   क्लासरूमची निर्मिती करण्यात आली आहे. त्यातील दोनशे शाळांतील व्हर्च्युअल   क्लासरूम सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित आणि विज्ञान वगळून अन्य विषयांची श्राव्य पुस्तके तयार करण्यात आली आहेत. कार्यक्रमासाठी विविध ठिकाणांहून आलेल्या विद्यार्थ्यांनाही शिक्षणमंत्र्यांना प्रश्न विचारण्याची संधी मिळाली.