लोकसभा निवडणुकीसाठी पुणे मतदारसंघाच्या निरीक्षक डॉ. एस. स्वर्णा आणि मावळ मतदारसंघासाठीचे निरीक्षक आशिष कुमार यांनी बुधवारी विविध मतदान केंद्रांना भेट देत पाहणी केली.
आशिष कुमार यांनी मावळ परिसरातील कामशेत, नाणे, कामरे, नाणे मावळ, गोवित्री, उकसाण, तळेगाव दाभाडे यांसह दुर्गम भागांतील २८ मतदान केंद्रांसह ११९ मतदान केंद्रांची पाहणी केली. पिंपरी आणि चिंचवड मतदारसंघातील १० ठिकाणच्या ८१ मतदान केंद्रांची पाहणी करून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, अपंगांसाठी रॅम्प, स्वच्छतागृह, प्रकाश आणि फर्निचर या बाबींची माहिती घेऊन मतदान केंद्रांवर असलेल्या सुविधांबाबत समाधान व्यक्त केले. तर, काही ठिकाणी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासंबंधीच्या सूचनाही केल्या. त्यांनी मावळ परिसरातील २५ मतदान केंद्रांनाही भेटी दिल्या.
डॉ. स्वर्णा यांनी कॅन्टोन्मेंट मतदारसंघातील विविध मतदान केंद्रांना भेट देऊन आवश्यक सुविधांची पाहणी केली. वानवडी येथील महादजी शिंदे विद्यालयातील मतदान जागृती फेरीतही सहभाग घेत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सहाय्यक निवडणूक अधिकारी रवींद्र खेबुडकर, कक्षाधिकारी तुषार तांदळे, अप्पाराव केंगार, प्रभाकर मोरे या वेळी उपस्थित होते.
फोटो व्होटर स्लिप देण्याची
प्रशासनाकडून सुरुवात
जिल्हा प्रशासनातर्फे मतदारांना मतदार चिठ्ठी (फोटो व्होटर स्लिप) देण्याची प्रक्रिया बुधवारपासून सुरू झाली. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील २ लाख ७० हजार मतदार चिठ्ठय़ांचे बुथ लेव्हल ऑफिसरमार्फत मतदारांना गुरुवारपासून (३ एप्रिल) वितरण करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त सहाय्यक निवडणूक अधिकारी रमा जोशी यांनी दिली. या मतदार चिठ्ठीत मतदाराचे छायाचित्र, मतदार केंद्राचे नाव, मतदार क्रमांक या माहितीचा तपशील आहे. यामुळे मतदारांना आवश्यक ती माहिती उपलब्ध होणार असल्याने मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्य़ात १३ ठिकाणी एक खिडकी कक्ष
निवडणूक प्रचारासाठीच्या आवश्यक परवानगी देण्यात सुसूत्रता येण्यासाठी ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये सहाय्यक निवडणूक अधिकारी स्तरावर एक खिडकी कक्ष सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यानुसार शिरुर मतदारसंघात जुन्नर, शिरुर, आंबेगाव, खेड-आळंदी अशा चार ठिकाणी. बारामती मतदारसंघात दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर आणि भोर अशा पाच ठिकाणी कक्ष सुरू करण्यात आला आहे. पुणे मतदारसंघातील शहरी भागासाठी पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रात अल्पबचत भवन, हडपसर येथील साधना विद्यालय आणि िपपरी-चिंचवड महापालिका भवन अशा तीन ठिकाणी एक खिडकी कक्ष सुरू करण्यात आला आहे.