25 May 2020

News Flash

…म्हणून हा पुणेकर वकील हेल्मेटऐवजी कढई डोक्यात घालून करतो प्रवास

वकिलाच्या पोषाखात डोक्यावर कढई घालून दुचाकीवरून करतो प्रवास

वाजिद खान बिडकर (फोटो सौजन्य: पुणे मिरर)

पुण्यामध्ये हेल्मेट सक्तीवरून पोलीस विरुद्ध सामान्य नागरिक असा संघर्ष सुरु झाला आहे. एकीकडे पुणे पोलिसांनी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कठोर भूमिका स्वीकारत १ जानेवारीपासून हेल्मेट सक्तीला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे या हेल्मेट सक्तीला पुण्यामधील काही नागरिकांनी जोरदार विरोध केला आहे. अनेकांनी रस्त्यावर उतरून, हातामध्ये फलक घेऊन आपला हेल्मेट सक्तीला असणारा विरोध दर्शवला आहे. आता पुणेकरांनी सक्तीने हेल्मेट घालायचे की नाही यावर वाद सुरु असतानाच पुण्यामधील हडपसर येथे राहणाऱ्या एका वकिलाने चक्क डोक्यावर कढई घालून प्रवास करण्याचा निर्णय घेतला आहे.

पुण्यामधील रस्त्यावर सध्या एक व्यक्ती वकिलाच्या पोषाखात डोक्यावर कढई घालून दुचाकीवरून जाताना दिसते, या व्यक्तीचे नाव आहे वाजिद खान बिडकर. मुळात बिडकर यांचा हेल्मेट सक्तीला विरोध नसून हेल्मेटच्या दर्जाबद्दलच त्यांना आक्षेप आहे. दर्जाहीन हेल्मेट वापरणाऱ्यांवर पोलीस कारवाई करत नाहीत म्हणूनच मी डोक्यावर कढई घालून सध्या पुण्यामध्ये दुचाकीवरून प्रवास करतो असं बिडकर सांगतात.

अशाप्रकारे कढई डोक्यात घालून फिरणाऱ्या बिडकरांना वाहतूक पोलिसांनी अडवल्यावर ते हेल्मेटऐवजी कढई घालण्यामागील कारण पोलिसांना समजवून सांगतात. अनेकदा त्यांच्यात आणि पोलिसांमध्ये वादावदी होते पण बिडकर आपला मुद्दा पटवून देताना मागे हटत नाहीत. हेल्मेटमुळे डोक्याचं संरक्षण व्हावं अशी अपेक्षा असते. मात्र अनेकदा दर्जाहीन हेल्मेट वापरली जातात. या हेल्मेटमुळे त्याच्या वापराचा मूळ उद्देशच साध्य होत नाही. त्याचप्रमाणे हेल्मेट कसे असावे याबद्दल कोणतीही नियमावली नसल्याने डोक्याचे संरक्षण करण्यासाठी मला या कढईचा वापर हेल्मेट म्हणून करु द्यावा अशी लेखी मागणीच बिडकरांनी पोलिसांकडे केली आहे. हेल्मेट कसे असावे याबद्दल नियम नसल्याने मी कढई हेल्मेट म्हणून वापरू शकतो असा दावा पेशाने वकील असणारे बिडकर करतात.

याच संदर्भात एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना पुणे वाहतूक पोलीस विभागाच्या उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी हेल्मेटबद्दल नियम असल्याचे सांगितले. वाहनचालकांनी आयएसआय मार्क असलेलेल बीआयएसने मानकाप्रमाणे तयार केलेले हेल्मेट घालणे आवश्यक असते. जर हेल्मेट या दर्जाचे नसेल तर वाहनचालकावर कारवाई करता येऊ शकते असे स्पष्टीकरण सातपुते यांनी दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2019 2:02 pm

Web Title: wajed khan bidkar from pune wears the tin pot helmet
Next Stories
1 पुण्यात हेल्मेटशिवाय बाईक चालवणाऱ्या २२ वर्षीय युवकाचा अपघातात मृत्यू
2 वर्गात आपली नक्कल केली म्हणून शिक्षकाकडून विद्यार्थ्याला बेदम मारहाण
3 हेल्मेट सक्तीनंतर पुण्यात कारवाई, विरोध आणि खरेदीही जोरात!
Just Now!
X