आठवडाभर झालेल्या चांगल्या पावसामुळे खडकवासला धरण सद्यस्थितीत सुमारे ८४ टक्के भरले असून, धरणाच्या क्षेत्रामध्ये मोठा पाऊस झाल्यास कोणत्याही क्षणी धरणातून कालवा किंवा नदीतून पाणी सोडण्याची शक्यता पाटबंधारे विभाग व पालिकेकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मागील आठवडय़ापासून खडकवासला, पानशेत, टेमघर, वरसगाव धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये चांगला पाऊस होत असल्याने धरणात पाणीसाठा वाढला आहे. चारही धरणांमध्ये रात्री सुमारे ११ टीएमसी (अब्ज घनफूट) पाणीसाठा जमा झाला होता. खडकवासला वगळता इतर तीन धरणे अद्याप २५ ते ४० टक्क्य़ांपर्यंतच भरली आहेत. मात्र, खडकवासला धरण सोमवारी संध्याकाळी पाचपर्यंत ८४ टक्के भरले होते. संध्याकाळनंतरही पाऊस कायम राहिल्यास या टक्केवारीत वाढ होण्याची शक्यता गृहीत धरून दोन हजार क्युसेसने पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. महापौर प्रशांत जगताप यांनीही पत्रकारांना याबाबतची माहिती दिली होती. त्यानुसार रात्री आठपासून कालव्यात विसर्ग करण्याचे नियोजन सुरू होते. त्यानुसार पाठबंधारे विभागाचे कर्मचारी धरणावर तळ ठोकून होते. मात्र, संध्याकाळी पाचनंतर पावसाचा जोर ओसरला. रात्री आठपर्यंत धरणक्षेत्रामध्ये अत्यल्प पाऊस झाला. त्यामुळे रात्री पाणी सोडण्याचा निर्णय मागे घेण्यात आल्याचे पाटबंधारे विभागाने सांगितले. पाऊस वाढल्यास मंगळवारी सकाळी आढावा घेऊन पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात येणार असल्याने कालवा व नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.