पुणे शहरात अनेक बडय़ा बांधकाम व्यावसायिकांचे नवे प्रकल्प ज्या ज्या भागांमध्ये मंजूर झाले आहेत, नेमक्या त्याच भागात महापालिकेने तब्बल २३१ कोटी रुपये खर्चाचे सिमेंट काँक्रिटचे रस्ते बांधण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. सध्या निधी नसल्यामुळे शहरातील अनेक विकासकामे थांबवणाऱ्या महापालिकेने बांधकाम व्यावसायिकांच्या प्रकल्पांशेजारीच नवे रस्ते करण्याचा जो योगायोग साधला आहे, त्याबद्दल आता जाहीर रीत्या संशय व्यक्त होत आहे.
महापालिकेतील विरोधी पक्षनेता आणि काँग्रेसचे गटनेता अरविंद शिंदे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत या नव्या ‘योगायोगा’ची माहिती दिली. महापालिकेची अनेक विकासकामे सध्या निधीअभावी थांबण्यात आली आहेत. एकीकडे विकासकामांना निधी नसल्याची ही परिस्थिती असताना दुसरीकडे मात्र २३१ कोटी ४६ लाख रुपये खर्चून शहरातील आठ रस्ते तयार करण्यासाठी निविदा मागवण्याची प्रक्रिया महापालिकेच्या पथ विभागात सुरू असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
कात्रज, सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुक परिसर, महमंदवाडी, वारजे उड्डाणपूल ते चांदणी चौक महामार्गाच्या दोन्ही बाजू, वडगाव महामार्गालगतच्या दोन्ही बाजू, धायरी, कोंढवा बुद्रुक आणि हडपसर ते मुंढवा परिसर या आठ प्रमुख भागातील हे रस्ते असून त्यांची रुंदी २४ ते ८४ मीटर इतकी आहे. हे सर्व रस्ते आधी काम नंतर टप्प्याटप्प्याने पैसे (डिफर्ड पेमेंट) या तत्त्वावर  विकसित करण्याचा प्रस्ताव आहे. मंजूर प्रस्तावानुसार दरवर्षी ४६ कोटी ३० लाख रुपयांप्रमाणे पुढील पाच वर्षांत हे पैसे परत केले जाणार आहेत.
अशाप्रकारे डिफर्ड पेमेंटने रस्ते तयार करण्यासाठी शहरातील ६० रस्त्यांची यादी अंदाजपत्रकात आहे. मात्र त्यातील आठच रस्ते का निवडले गेले याचे उत्तर प्रशासनाकडे नाही. हे आठ रस्ते फक्त बांधकाम व्यावसायिकांच्या हितासाठी केले जात असून ज्या परिसरात बडय़ा व्यावसायिकांच्या मोठय़ा प्रकल्पांचे बांधकाम नकाशे मंजूर आहेत, त्याच भागात हे रस्ते तयार करण्याचे नियोजन असल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे. मान्य नकाशे व पथ विभागाने तयार केलेले रस्त्यांचे प्रस्ताव तंतोतंत जुळत असल्याचेही ते म्हणाले.