तीन दिवस तुरळक पाऊस, थंडी आणि धुक्याची स्थिती

अरबी समुद्रात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणि त्यालगत असलेल्या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे संपूर्ण महाराष्ट्रातच सध्या हवामानाची स्थिती विचित्र झाली आहे. पुणे शहर आणि परिसरातही काही ठिकाणी गेले दोन दिवस हलक्या पावसाने हजेरी लावली. आकाशाच्या ढगाळ स्थितीमुळे किमान तापमानात वाढ होऊन थंडी घटली. मात्र, ही स्थिती निवळणार असून, तापमानात घट सुरू झाली आहे. पुढील दोन ते तीन दिवस शहरात हलका पाऊस, धुके आणि थंडीची स्थिती राहील. मात्र, कडाक्याच्या थंडीसाठी नव्या वर्षांची प्रतीक्षा करावी लागणार असल्याची सध्याची स्थिती आहे.

राज्यात आणि शहरात संपूर्ण डिसेंबर महिन्यामध्ये तापमानात झपाटय़ाने बदल झाले. उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची लाट आली. त्या भागातून राज्याकडे थंड वाऱ्यांचे प्रवाहही वाहत आहेत. मात्र, हवामानाच्या वेगवेगळ्या स्थितीमुळे त्यात सातत्याने अडथळे निर्माण झाले. त्यात मध्य भारतामध्ये निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा, बंगालच्या उपसागरावरून वाहणारे उष्ण वाऱ्यांचे प्रवाह आणि त्यानंतर सध्या अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे थंडीचा अडथळा निर्माण होऊन पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली. परिणामी शहर आणि परिसरात मागील आठवडय़ापासून अंशत: ढगाळ स्थिती निर्माण झाली.

डिसेंबरच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवडय़ामध्ये किमान तापमान कमी होऊन थंडी जाणवत होती. शहरातील किमान तापमनान ११ ते १४ अंशांच्या दरम्यान होते. हे तापमान सरासरीच्या तुलनेत २ ते ४ अंशांनी अधिक असले, तरी रात्री आणि पहाटे गारवा जाणवत होता. आकाशाची स्थिती ढगाळ झाल्यानंतर तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे थंडी गायब झाली. या आठवडय़ामध्ये किमान तापमान १७ ते १८ अंशांच्या पुढे राहिले. नाताळच्या दिवशी २५ डिसेंबरला थहरात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. दुसऱ्या दिवशी २६ डिसेंबरला किमान तापमान २१ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले होते. त्यामुळे हवेत उकाडा जाणवत होता. २७ डिसेंबरला मात्र त्यात ४.६ अंशांनी घट होऊन १६.८ अंश किमान तापमान नोंदविले गेले. त्यामुळे पुन्हा काहीशी थंडी जाणवू लागली आहे.

पुढील दोन ते तीन दिवसांत तापमानात बदल होऊन पुन्हा थंडी जाणवणार असल्याचा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे. मात्र, आकाश निरभ्र होण्यासाठी महिना अखेरीची वाट पहावी लागणार आहे. त्यानंतर नव्या वर्षांच्या सुरुवातीला शहर आणि परिसरात थंडीचे प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे.

आठवडय़ातील हवामानाचा अंदाज

पुणे वेधशाळेने वर्तविलेल्या अंदाजानुसार २८ डिसेंबरला आकाश अंशत: ढगाळ राहून धुके पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर २९ आणि ३० डिसेंबरला आकाश अंशत: ढगाळ राहून अत्यल्प स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या दोन्ही दिवशीही शहरात पहाटे धुके पडण्याचा अंदाज आहे. ३१ डिसेंबरपासून मात्र आकाशाची स्थिती निरभ्र राहणार आहे. परिणामी तापमानात घट होऊन थंडीचे प्रमाण वाढत जाणार आहे. या दोन ते तीन दिवसांमध्ये किमान तापमान १४ ते १५ अंशांपर्यंत खाली येण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.