नाटय़ परिषदेच्या पुणे शाखेचा अजब कारभार
कोशाध्यक्षांच्या अनुपस्थितीमध्ये अंदाजपत्रकास मंजुरी देण्याचा सोपस्कार अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या बैठकीत रविवारी पूर्ण करण्यात आला. शाखेच्या सर्वसाधारण सभेत खर्चाला मान्यता देण्यात आली असली तरी ही बैठक घटनाबाह्य़ असल्याचे आक्षेप सदस्यांनी नोंदविले. मात्र, कोशाध्यक्षांच्या गैरहजेरीमध्येही हे विषय मंजूर होऊ शकतात, अशी भूमिका घेत सभा उरकण्यात आली.
नाटय़ परिषदेच्या पुणे शाखेची सर्वसाधारण सभा रविवारी घेण्यात आली. यामध्ये शाखेच्या अंदाजपत्रकास मंजुरी घेण्याचे महत्त्वाचे काम करण्यात आले. मात्र, हे विषय ज्या पदाधिकाऱ्याशी संबंधित आहेत ते कोशाध्यक्ष नेमके आजारपणामुळे या सभेस गैरहजर होते. त्यामुळे आर्थिक विषयांना मंजुरी देताना कोशाध्यक्ष हाच पडद्यामागचा कलाकार झाला अशी चर्चा सदस्यांमध्ये रंगली होती. परिषदेच्या शाखेचा वर्धापनदिन आणि रंगभूमी दिन असे वर्षांतील दोन कार्यक्रम वगळता पुणे शाखा नेमके काय काम करते असा प्रश्न नाटय़ क्षेत्रातील कलाकारच उपस्थित करीत आहेत. त्याचप्रमाणे कार्यकारिणीच्या बैठका या केवळ दिवंगत कलाकाराला श्रद्धांजली अर्पण करणे आणि अभिनंदनाचे ठराव संमत करण्यापुरत्याच उरल्या असल्याचे मत कार्यकारिणी सदस्य खासगीमध्ये व्यक्त करताना दिसून येतात.
कोशाध्यक्षांच्या अनुपस्थितीत होणारी सर्वसाधारण सभा घटनाबाह्य असून त्यात मंजूर होणारे आíथक विषय हेदेखील घटनाबाह्य आणि बेकायदा आहेत. खर्च, ताळेबंद, अंदाजपत्रक हे विषय कोशाध्यक्षाने मांडायचे असतात, असे आक्षेप नोंदवत, आíथक विषय बाजूला ठेवा, अशी मागणी काही सदस्यांनी या सभेमध्ये केली. कोशाध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी, तब्येत बरी नसल्याने बठकीला उपस्थित राहू शकणार नाही, असे पत्र परिषदेला पाठवले होते. मात्र कोशाध्यक्षांच्या अनुपस्थित खर्च व अंदाजपत्रकाला मान्यता देता येते, अशी भूमिका घेत पदाधिकाऱ्यांनी बठकीच्या अंकावर ‘पडदा’ टाकला.

‘तब्येत बरी नसल्याने बठकीला उपस्थित राहू शकणार नाही, असे परिषदेला कळवले होते. अध्यक्ष, प्रमुख कार्यवाह आणि कोशाध्यक्ष यांच्या सहीने कारभार चालत असल्याने तशी अडचण नाही,’ असे कोशाध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी सांगितले. तर, कोशाध्यक्षांच्या अनुपस्थितीतही खर्चाला मान्यता देण्यात येते,’ अशी भूमिका शाखा अध्यक्ष सुरेश देशमुख यांनी मांडली.