कोणत्याही क्षेत्रात तुम्ही वारशाच्या भरवशावर फार काळ टिकू शकत नाहीत. तुमचे कामच ग्राह्य धरले जाते. त्यामुळे आवडीचे क्षेत्र निवडा म्हणजे, त्यात तुम्ही जास्त काळ काम करू शकाल. राजकारणात घराणेशाही चालते, असे जरी म्हणत असले, तरी तुमच्या कामाशिवाय जनताही तुम्हाला निवडून देत नाही. असे मत शिवसेनेचे युवा प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले.

ईओ पुणे शाखेने आयोजित केलेल्या मुलाखती दरम्यान आदित्य ठाकरे बोलत होते. यावेळी ‘ईओ पुणे’ शाखेचे अध्यक्ष मानव घुवालेवाला, संवाद विभागाचे प्रमुख विशाल वोहरा, बोर्ड सदस्य अक्षय आढळराव पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, तरुणांनी राजकारणाकडे वळावे ही आनंदाची बाब असून राजकारणात येणे म्हणजे निवडणूक लढविणे एवढेच लक्ष ठेवता कामा नये. आपले मतदार फार सुज्ञ आहेत. ते आपल्या पाठीशी असलेल्या नावापेक्षा कामाला अधिक महत्व देतात. त्यामुळे आपल्या कामातून नाव कमवा आणि मग निवडणूक लढवावी असे त्यांनी सांगितले.