भक्ती बिसुरे

राज्यातील महिलांचे विधिमंडळात नेतृत्व करणाऱ्या महिला आमदार बदलत्या काळाला अनुसरून समाज माध्यमांचा वापर करतात, पण या माध्यमांवरील त्यांच्या भिंती बहुतेक वेळा केवळ दिनविशेष आणि शुभेच्छांनीच व्यापल्या आहेत.

महिला, त्यांचे प्रश्न, त्या प्रश्नांची उत्तरे, स्वत:ची कामे यांना त्या भिंतींवर नगण्य स्थान असल्याचे दिसून आले आहे. ‘संपर्क’ या संस्थेने केलेल्या अभ्यासातून हे निरीक्षण समोर आले आहे.

महाराष्ट्रातील विविध भागांतील महिलांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या २४ आमदार विधिमंडळात कार्यरत आहेत. समाज माध्यमांवर त्यांची ‘पेजेस’ही आहेत. त्या ‘पेजेस’ चा वापर या आमदार नेमका कशासाठी करतात याचा अभ्यास ‘संपर्क’ या संस्थेने केला. महिला, बालके , शेती, शिक्षण किंवा विधानसभेतील स्वत:चे काम यांबाबत समाज माध्यमात त्या अत्यल्प माहिती देत असल्याचे दिसून आले. ‘संपर्क’ संस्थेने याबाबतची माहिती अहवालाद्वारे प्रसिद्ध केली आहे.

२०२० मध्ये २४ महिला आमदारांनी आपल्या ‘पेज’ वर प्रसिद्ध केलेल्या मजकुराद्वारे त्यांचे प्राधान्यक्रम, कामे, स्वारस्यविषय समजून घेण्यासाठी हा अभ्यास केल्याचे संपर्क संस्थेने स्पष्ट केले आहे. डॉ. भारती लव्हेकर, श्वेता महाले आणि प्रणिती शिंदे या आमदारांच्या पेजला एक लाखांवर ‘लाईक्स’ आणि अनुसरणकर्ते (फॉलोअर्स)आहेत. त्यांपैकी सर्वाधिक तीन लाखांवर ‘लाईक’ आणि ‘फॉलोअर्स’ डॉ. भारती लव्हेकर यांच्या पेजला आहेत. विधानसभा कामाबाबत सर्वाधिक पोस्ट सुलभा खडके आणि प्रतिभा धानोरकर यांच्या आहेत. यशोमती ठाकुर यांनी बालकांविषयी, तर वर्षां गायकवाड यांनी शिक्षणाविषयी सर्वाधिक माहिती पोस्ट केली आहे. सरोज अहिरे या विधिमंडळाच्या महिला-बालकल्याण समितीच्या अध्यक्ष आहेत, तरीही त्यांच्या पेजवर त्या विषयावरील पोस्ट नगण्य आहेत. नमिता मुंदडा आणि सीमा हिरे यांनी सर्वाधिक महिला विषयक पोस्ट केल्या आहेत.

अवघा १.५९ टक्के मजकूर महिलाविषयक

समाज माध्यमांवर महिला आमदारांच्या पेजवरील ७१ टक्के मजकूर दिनविशेष, शुभेच्छा, जयंतीबाबत आहे. अवघा १.५९ टक्के मजकूर महिलांविषयक आहे. विधानसभेतील स्वत:च्या कामाबाबत के वळ ०.४५ टक्के  माहिती या महिलांचे ‘पेजेस’ देतात. मतदार संघातील घडामोडींची माहिती ६.६२ टक्के आहे. करोना महामारीमुळे आरोग्य विषयक माहितीचे प्रमाण ५.०६ टक्के एवढे आहे.