पुण्यात पावसामुळे हाहाकार माजला असून प्रचंड नुकसान झालं आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं असून लोक अडकले आहेत. त्यांची सुटका करण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान अथक प्रयत्न करत आहेत. अशीच एक घटना समोर आली आहे जिथे अग्निशमन दलाच्या जवानाने जीव धोक्यात घालून १० महिन्याच्या बाळाला जीवनदान दिलं आहे. या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्वारगेट येथील मित्रमंडळ चौक येथे हे बाळ आपल्या कुटुंबासहित अडकलं होतं. बचावकार्य सुरु असताना अग्निशमन दलाचे जवान मारुती देवकुळे यांनी या बाळाची सुखरुप सुटका केली. त्यांनी बाळाला टबमध्ये ठेवत टायरच्या सहाय्याने बाहेर आणलं.

याबद्दल बोलताना मारुती देवकुळे यांनी सांगितलं आहे की, “माझ्यापेक्षा मला मुलाचीच जास्त काळजी वाटत होती. आधी त्याच्या आजी-आजोबांना पुढे नेऊन सोडलं होतं. तर आई-वडील मागेच होते”. बाळ जेव्हा सुखरुप पोहोचलं तेव्हा आपल्याला फार बरं वाटल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

आणखी वाचा- Video : जेव्हा पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी वाहतूक पोलिसाला ठोकला कडक ‘सॅल्यूट’ !

मंगळवारी रात्री सुरू झालेल्या पावसाने बुधवारी मध्यरात्री रौद्रावतार धारण केला. सिंहगड, धनकवडी, सहकारनगर, कात्रज या भागातील सोसायट्या आणि घरामध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे प्रचंड हाल सुरू आहेत. पुण्यातील पावसात आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे.