पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी या संदर्भातील घोषणा परिपत्रकाद्वारे केली. त्यानुसार येत्या सोमवारी म्हणजेच २७ मे रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची निकालाबाबतची उत्सुकता आता संपुष्टात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – पिंपरी : अनधिकृत होर्डिंगनंतर आता मोबाइल टॉवर रडारवर; शहरात किती आहेत अनधिकृत टॉवर?

बारावीचा निकाल २१ मे रोजी जाहीर करण्यात आला होता. त्याच दिवशी दहावीचा निकाल २७ मे रोजी जाहीर होणार असल्याची चर्चा होती. यंदा दहावीच्या परीक्षेसाठी १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. विद्यार्थी दुपारी एक वाजल्यापासून ऑनलाइन निकाल पाहू शकतात. https://mahresult.nic.in, http://sscresult.mkcl.org, https://sscresult.mahahsscboard.in, https://results.digilocker.gov.in, https://results.targetpublications.org या संकेतस्थळांद्वारे निकाल पाहता येणार आहे.

ऑनलाइन निकालानंतर दहावीच्या परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन (http://verification.mh-ssc.ac.in) स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करता येईल. गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी २८ मे ११ जून या कालावधीत ऑनलाइन अर्ज करून शुल्क भरता येईल.

हेही वाचा – कल्याणीनगर अपघात प्रकरण : बांधकाम व्यावसायिक सुरेंद्र अगरवाल यांच्या बंगल्यावर छापा

मार्च २०२४ परीक्षेच्या उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाइन अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करून शुल्क भरून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक राहील. पुनर्मूल्यांकन करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.

मार्च २०२४ च्या दहावीची परीक्षा सर्व विषयांसह देऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोनच संधी (जुलै-ऑगस्ट २०२४ व मार्च २०२५) श्रेणी/गुणसुधार योजनेअंतर्गत उपलब्ध राहतील.

जुलै-ऑगस्ट २०२४ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी व श्रेणीसुधार विद्यार्थ्यांसाठी ३१ मेपासून मंडळाच्या संकेतस्थळावरुन ऑनलाइन अर्ज भरून घेण्यात येणार आहेत. त्याबाबतचे परिपत्रक स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 10th result date maharashtra announced pune print news ccp 14 ssb