चित्रबलाक किंवा शृंगी घुबड यांपैकी एका पक्ष्याला ‘पुण्याचा पक्षी’ म्हणून ओळख मिळणार आहे. तर लांडगा किंवा जावडी मांजर (स्मॉल इंडियन सिव्हेट) यांपैकी एक प्राणी पुण्याचा प्राणी ठरणार आहे.
पुण्याची वेगवेगळी वीस निसर्ग मानचिन्हे ठरवण्यासाठी एकूण चाळीस नामांकने निवडण्यात आली आहेत. जिविधता महोत्सवात रविवारी त्या- त्या विषयातील तज्ज्ञ आणि पर्यावरणप्रेमींनी एकत्र येऊन चर्चेअंती वीस प्रकारातील प्रत्येकी दोन नामांकनांवर शिक्कामोर्तब केले. या नामांकनांवर लोकशाही पद्धतीने नागरिकांची मते घेऊन नंतर पुण्याची अधिकृत मानचिन्हे ठरतील.  
बायोस्फीअर्स संस्था आणि पुणे वन विभागाच्या वतीने ही नामांकने निवडण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्राचे महापौर चंचला कोद्रे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. राष्ट्रीय पेशी विज्ञान केंद्राचे संशोधक डॉ. योगेश शौचे, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संशोधक डॉ. मुकुंद देशपांडे, पुण्याचे प्रमुख वनरक्षक नितिन काकोडकर, जीत सिंग, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक डॉ. अनिल सहस्रबुद्धे, ‘अ‍ॅग्री- हॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया’चे मानद सचिव सुरेश पिंगळे, ‘बायोस्फीएर्स’चे संस्थापक अध्यक्ष सचिन पुणेकर या वेळी उपस्थित होते.
निसर्ग मानचिन्हांसाठी आधी १८ प्रकारात नामांकने निवडण्यात येणार होती. रविवारी यात आणखी दोन प्रकारांचा समावेश करून वीस प्रकारांवर चर्चा करण्यात आली. यात कीटकांमध्ये मधमाशी आणि अ‍ॅटलास पतंग स्पर्धेत आहेत. सरिसृप प्राण्यांमध्ये मयूर कासव (डेक्कन सॉफ्ट शेल टर्टल) आणि सरगोटा (फॅन थ्रोटेड लिझार्ड) यांच्यातून निवड होणार आहे. ‘कॅव्हेनझाईट’ आणि ‘ग्रीन अपॉफिलाईट’ यांच्यातून पुण्याचे खनिज निवडले जाईल. शिंदळ माकोडी (फेरेआ इंडिका) आणि घंटीमुद्रा (अब्युटिलॉन रानडेई) या फुलांमधून पुण्याचे फूल निवडले जाईल. तर अंजिर आणि ज्वारीची स्थानिक वाणे पुण्याचे पीक म्हणून मान्यता मिळवण्यासाठी स्पर्धेत आहेत.
एच १ एन १ विषाणू  ‘पुण्याचा विषाणू’ म्हणून स्पर्धेत!
निसर्ग मानचिन्हांमध्ये ‘पुण्याचा विषाणू’ या प्रकारासाठीही नामांकने निश्चित करण्यात आली. यात ‘एच १ एन १’ आणि ‘पपया रिंगस्पॉट व्हायरस’ या दोन विषाणूंची निवड करण्यात आली. पुणेकरांचा कौल मिळाल्यास ‘स्वाईन फ्लू’साठी कारणीभूत ठरणारा एच १ एन १ चक्क पुण्याचे ‘विषाणू मानचिन्ह’ म्हणून मिरवू शकेल.