पुण्याच्या राज्यसभेतील खासदार वंदना चव्हाण यांनी स्वत:च्या जागेत वाढवलेली सुमारे पाच हजार देशी रोपे पुणे महापालिकेच्या उद्यान विभागाला भेट दिली. ही झाडे पाच-सहा फुटांपर्यंत वाढलेली असल्यामुळे त्यांच्या यशस्वी रोपणाची शक्यता अधिक आहे.
वंदना चव्हाण यांचा देहूजवळील भंडारा डोंगराच्या पायथ्याशी ‘रेन बो फार्मस्’ नावाचा फार्म आहे. तिथे त्यांनी हजारो रोपे लावली आणि वाढवली आहेत. त्यात मुख्यत: देशी वृक्षांच्या रोपांचा समावेश आहे. ही रोपे ५-६ फूट उंचीपर्यंत वाढली आहेत. त्यापैकी काही रोपे त्यांनी याआधी खासगी रोपवाटिकांना दिली होती. या रोपांचे शहरात रोपण व्हावे आणि शहरातील हरित आवरण वाढावे या हेतूने त्यांनी सोमवारी सुमारे पाच हजार रोपे पुणे महापालिकेला भेट दिली. त्यात करंज, चिंच, गुलमेंदी, बांबू, जास्वंद अशा रोपांचा समावेश आहे. यापूर्वी त्यांनी कडूलिंब, जांभूळ अशी रोपे दिली आहेत.
सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यानात सोमवारी सकाळी एक कार्यक्रम झाला. त्यात श्रीमती चव्हाण यांनी पुण्याचे महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्याकडे ही रोपे सोपवली. या वेळी नगरसेवक विकास दांगट, अश्विनी कदम, विनायक हनमघर, महापालिकेचे मुख्य उद्यान अधिकारी तुकाराम जगताप, वृक्ष अधिकारी मोहन ढेरे आदी उपस्थित होते. या रोपांची जोपासना करून ती पूर्ण वाढीची होईपर्यंत जपावी, अशी अपेक्षा चव्हाण यांनी या वेळी व्यक्त केली.