अद्यापही २७ हजार ९९२ दुबार मतदार

पुणे : जिल्ह्य़ातील मतदार यादीमध्ये असलेल्या दुबार मतदारांची नावे वगळण्याची मोहीम जिल्हा प्रशासनाने हाती घेतली आहे. त्यानुसार आतापर्यंत ६० हजार ७३२ मतदार मतदार यादीतून ‘बाद’ झाले आहेत. त्यामध्ये पुणे शहरातील आठ मतदार संघांतील २४ हजार ५३० मतदार असून सर्वाधिक वगळलेले दुबार मतदार खडकवासला मतदार संघातील ७३९४ आहेत. जिल्ह्य़ातील मतदारांची संख्या ७८ लाख ८७ हजार ८७४ आहे. त्यामध्ये जिल्ह्य़ातील २१ विधानसभा मतदार संघांमध्ये १५ जानेवारी २०२१ पर्यंत ८८ हजार ७२४ दुबार मतदार होते. त्यापैकी ६० हजार ७३२ मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. मात्र, अद्यापही २७ हजार ९९२ मतदार दुबार असल्याचे जिल्हा निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले.

   मतदार यादीत दोन ठिकाणी नाव असल्यास नागरिकांनी स्वत:हून प्रशासनाकडे माहिती देणे आवश्यक असते. मात्र, नागरिकांकडून ही माहिती देण्यात येत नाही. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झाल्यावर अनेक नागरिकांकडून जुन्या ठिकाणी असलेले मतदार यादीतील नाव कमी न करता नव्या ठिकाणी नोंदणी करण्यात येते. त्यामुळे दुबार मतदारांची संख्या वाढली आहे. पुण्यातील आठ विधानसभा मतदार संघांपैकी खडकवासला मतदार संघामध्ये आठ हजार ७२२ दुबार मतदार होते. त्यातील सर्वाधिक ७३९४ दुबार मतदार वगळण्यात आले आहेत. वडगाव शेरी मतदार संघातून ३०३८, शिवाजीनगरमधून १०३३, कोथरूडमधून १५२२, पर्वतीमधून २४५६, हडपसरमधून ५२४९, पुणे कॅ न्टोन्मेंटमधून १६७७, तर कसबा पेठ मतदार संघातून १८६१ दुबार मतदार वगळण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक शाखेकडून देण्यात आली.

दरम्यान, मतदार यादी अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यानुसार आतापर्यंत ६० हजार ७३२ दुबार मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. दुबार नावे असल्यास संबंधित मतदारांनी माहिती द्यावी, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत यांनी के ले आहे.

पुण्यातील दुबार मतदार सद्य:स्थिती

मतदार संघ     दुबार मतदार    वगळलेले अद्याप दुबार

दुबार मतदार असलेले मतदार

वडगाव शेरी    ५२५०   ३०३८   २२१२

शिवाजीनगर १४९६      १०३३                     ४६३

कोथरूड     ६५१३          १५२२                  ४९९१

खडकवासला     ८७२२      ७३९४             १३२८

पर्वती          ३७५४       २४५६             ९९८

हडपसर         ८८६३          ५२४९               ३६१४

पुणे कॅ न्टोन्मेंट २३४५          १६७७             ६६८

कसबा पेठ  २३३९       १८६१  ४७८

जिल्ह्य़ात दुबार मतदार कमी

जिल्ह्य़ातील दहा विधानसभा मतदार संघांमध्ये २९ हजार २१३ दुबार मतदार होते. त्यातील २३ हजार ९८८ दुबार मतदार वगळण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या ५२२५ दुबार मतदार अद्यापही मतदार यादीत आहेत. पुण्यातील आठ, तर पिंपरी-चिंचवडमधील तीन मतदार संघांच्या तुलनेत ही संख्या कमी आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये ८०१५ दुबार मतदार

पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीन विधानसभा मतदार संघामध्ये २० हजार १६९ दुबार मतदार होते. त्यातील १२ हजार २१४ दुबार मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. त्यामुळे अद्यापही ८०१५ दुबार मतदारांची नावे मतदार यादीत असल्याचे जिल्हा निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले.