अभिजात संगीताच्या जगभरातील दर्दी रसिकांची तृष्णा भागविणाऱ्या ‘सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवा’ त यंदाही जुन्या व नव्या पिढीतील कलाकारांच्या बहारदार कलाविष्काराची अनुभूती मिळणार आहे. विश्वविख्यात तबलावादक पं. अनिंदो चटर्जी यांच्या साथसंगतीने होणारे उस्ताद निशात खाँ यांचे सतारवादन, गायक संजीव अभ्यंकर व डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे यांची ‘जसरंगी’ जुगलबंदी, बासरीवादक प्रवीण गोडखिंडी व व्हायोलिनवादक आर. कुमरेश यांचे हिंदूुस्थानी कर्नाटकी शैलीतील सहवादन व शोवना नारायण यांचे कथक नृत्य यंदाच्या महोत्सवाचे आकर्षण आहे. डॉ. प्रभा अत्रे, पं. जसराज, मालिनी राजूरकर, पं. अजय चक्रवर्ती, परवीन सुलताना आदींची कसदार गायकीही महोत्सवात रंगणार आहे.
‘लोकसत्ता’ माध्यम प्रायोजक असलेला व आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येणारा हा महोत्सव १२ ते १५ डिसेंबर या कालावधीत रमणबाग येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर होणार आहे. महोत्सवात सहभागी कलाकारांची माहिती मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. महोत्सवाचे हे ६१ वे वर्षे आहे. यंदा चार दिवस हा महोत्सव होणार असून, त्यात एकूण पाच सत्र आयोजित करण्यात आली आहेत. संपूर्ण महोत्सवात तेवीस कलाविष्कार व पंचवीसहून अधिक मान्यवर कलाकार सहभागी होणार आहेत. त्यात आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कलाकारांबरोबरच संगीत क्षेत्राच्या क्षितिजावरील नव्या प्रतिभावंत कलावंतांचाही सहभाग असणार आहे.
  तिकिटांचे दर मागील वर्षांपेक्षा कमी
महोत्सवासाठी तिकिटाचे दर मागील वर्षांपेक्षा कमी ठेवण्यात आल्याचे सांगून जोशी म्हणाले की, संपूर्ण महोत्सवासाठी खुर्चीसाठी दोन हजार रुपये, तर भारतीय बैठकीसाठी ३५० रुपये तिकीट असेल. भारतीय बैठकीसाठी दर दिवसाचे तिकीटही उपलब्ध आहे. पहिल्या तीन दिवसांसाठी प्रतिदिवस शंभर रुपये, तर शेवटच्या दिवसासाठी दोनशे रुपये तिकीटदर असेल. विद्यार्थ्यांना ओळखपत्र दाखवून सवलतीच्या दरात तिकिटे मिळतील. तिकीटविक्री ५ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. शिरीष ट्रेडर्स (कमला नेहरू पार्क), नावडीकर म्युझिकल्स (कोथरूड), दिनशॉ अॅण्ड कंपनी (लक्ष्मी रस्ता), बेहेरे बंधू आंबेवाले (शनिपार) येथे तिकिटे उपलब्ध असतील.
असा रंगणार संगीताचा महामेळा
पहिला दिवस (गुरुवार, १२ डिसेंबर)
– दुपारी ३.३० वाजता मधुकर धुमाळ यांच्या सनईवादनाने सुरुवात. डॉ. रेवा नातू यांचे गायन, संजीव अभ्यंकर व डॉ. अश्विनी भिडे- देशपांडे यांची ‘जसरंगी’ जुगलबंदी, ज्येष्ठ तबलावादक पं. अनिंदो चटर्जी यांच्या साथसंगतीने उस्ताद निशात खाँ यांचे सतारवादन, पं. जसराज यांच्या गायनाने सत्राची सांगता.
दुसरा दिवस (शुक्रवार, १३ डिसेंबर)
– वसीम अहमद खाँ यांच्या गायनाने दुपारी चार वाजता सत्राची सुरुवात. पं. उल्हास बापट यांचे संतूरवादन, शोवना नारायण यांचे कथक नृत्य, बेगम परवीन सुल्ताना यांच्या गायनाने सत्राची सांगता.
तिसरा दिवस (शनिवार, १४ डिसेंबर)
– हरीश तिवारी यांच्या गायनाने दुपारी चार वाजता सत्राची सुरुवात. इंद्राणी मुखर्जी यांचे गायन, प्रख्यात बासरीवादक प्रवीण गोडखिंडी व प्रसिद्ध व्हायोलिनवादक आर. कुमरेश यांचे हिंदूुस्थानी व कर्नाटकी शैलीतील सहवादन, पं. राजा काळे यांचे गायन, मालिनी राजूरकर यांच्या गायनाने सत्राची सांगता.
चौथा दिवस (रविवार, १५ डिसेंबर)
सकाळचे सत्र
– पं. उपेंद्र भट यांच्या गायनाने सकाळी आठ वाजता सत्राची सुरुवात. जयंती कुमरेश यांचे कर्नाटकी शैलीतील वीणावादन, पं. अजय चक्रवर्ती यांच्या गायनाने सकाळच्या सत्राची सांगता.
सायंकाळचे सत्र
– पं. मीरा प्रसाद यांच्या सतारवादनाने दुपारी तीन वाजता सत्राची सरुवात. गुलाम नियाझ खाँ यांचे गायन, अर्शद अली खाँ यांचे गायन, कौशिकी चक्रवर्ती यांचे गायन, पं. राजीव तारानाथ यांचे सरोदवादन, परंपरेनुसार किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या गायनाने महोत्सवाची सांगता.