महापालिकेच्या स्थायी समितीपुढे दहा कोटी रुपयांच्या वर्गीकरणासाठी मांडण्यात आलेल्या प्रस्तावाला विरोध करत आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी या वर्गीकरणांना विरोध केला. या वर्गीकरणाबाबत पुणेकरांना माहिती समजली पाहिजे, अशी मागणी ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी यावेळी केली.
महापालिकेच्या अंदाजपत्रकात शहरातील वाहतूक सुधारणेसाठी विविध प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहेत. बहुमजली वाहनतळ बांधणे, भुयारी मार्ग, पादचारी मार्ग तसेच पूल बांधणे आदी कामांचा समावेश त्यात आहे. या प्रकल्पांसाठी निधीची तरतूदही करण्यात आली आहे. मात्र, या कामांवर हा निधी यंदा खर्च होणार नसल्याचे लक्षात आल्यानंतर वाहतुकीच्या योजनांसाठी ठेवण्यात आलेला हा निधी नगरसेवकांनी आपापल्या प्रभागात वळवण्याचे प्रस्ताव दिले आहेत. वीस प्रभागांमध्ये प्रत्येकी पन्नास लाख रुपये याप्रमाणे हा निधी वळवण्यात येणार आहे आणि निधी वळवण्याचा प्रस्ताव देणाऱ्यांमध्ये सर्वपक्षीय नगरसेवक आहेत.
अशा पद्धतीने दहा कोटी रुपये प्रभागांमधील कामांसाठी वर्ग करण्याच्या प्रस्तावाला आम आदमी पक्षाने विरोध केला आहे. पक्षाचे कोथरूड विधानसभा क्षेत्र समन्वयक तन्मय कानिटकर यांच्या नेतृत्वाखाली विरोधाचे पत्र शनिवारी संबंधितांना देण्यात आले. हा निधी अन्यत्र का वळवला जात आहे याची कारणमीमांसा द्या, तसेच वीस प्रभागातील विकासकामे म्हणजे कोणती कामे केली जाणार आहेत त्याची माहिती जाहीर करा, आदी मागण्या या पत्रातून करण्यात आल्या आहेत.