तीन सभांना गैरहजर राहिल्यास नगरसेवकपद रद्द करण्याची कारवाई केली जाते. मग, अधिकारी सलगपणे स्थायी समिती व पालिका सभांना दांडय़ा मारतात, त्यांचे जावईलाड कशासाठी केले जातात, असा मुद्दा उपस्थित करून स्थायी समितीचे अध्यक्ष महेश लांडगे यांनी नव्या विषयाचा तोंड फोडले आहे. लांडगे यांनी उपस्थित केलेल्या मुद्दय़ाचे गांभीर्य लक्ष घेत याबाबतच्या कायद्याची माहिती घेऊन त्यानुसार कारवाई करण्याचे आदेश आयुक्त राजीव जाधव यांनी प्रशासनाला दिले.
लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे सलग चार सभा तहकूब कराव्या लागल्याने घायकुतीला आलेल्या स्थायी समिती समिती सदस्यांनी शुक्रवारी सुटकेचा नि:श्वास सोडला. धोरणात्मक निर्णय घेता येणार नसले, तरी निदान कामकाजाला तरी सुरुवात झाल्याचे समाधान सदस्यांमध्ये होते. पदवीधर व विधानसभा निवडणुका लागोपाठ होणार असल्याने पुन्हा आचारसंहितेचे सावट समितीसमोर आहे. अशात, गुरुवारी महेश लांडगे यांनी सहशहर अभियंता राजन पाटील यांच्या सभांच्या उपस्थितीचा मुद्दा उपस्थित केला. आतापर्यंत ४१ सभा झाल्या, त्यापैकी ३५ वेळा पाटील गैरहजर होते. ते जाणीवपूर्वक बैठकांना हजर राहत नाहीत, याकडे त्यांनी आयुक्तांचे लक्ष वेधले. तीन सभांना नगरसेवक गैरहजर राहिल्यास त्याचे पद रद्द करण्याची कारवाई आयुक्त करतात. यापूर्वी अनेक नगरसेवकांवर तशाप्रकारे कारवाई करण्याचे प्रस्ताव मांडण्यात आले होते. तथापि, जे अधिकारी दांडय़ा मारतात, त्यांच्यावर काय कारवाई केली जाते, अशी विचारणा लांडगे यांनी केली. तेव्हा आयुक्तांनी मुख्य प्रशासन अधिकारी डॉ. उदय टेकाळे यांना सूचना देऊन याबाबतच्या कायद्याची माहिती घ्या व त्यानुसार कारवाई करा, असे आदेश दिले.