पिंपरी : भाजप कार्यकर्त्यांनी मावळ लोकसभेच्या उमेदवारीसाठी आग्रही मागणी केली होती. यात काहीही गैर नव्हते. पण, नेत्यांनी निर्णय घेतल्यानंतर आता तो विषय संपला आहे. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांप्रमाणेच आता कार्यकर्त्यांमध्येही एकमत होऊन खासदार बारणे यांना सर्वाधिक मताधिक्य मिळेल. महायुतीच्या विरोधात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांप्रमाणेच नेत्यांवरही कारवाई होईल, असा इशारा भाजपचे माजी आमदार, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी दिला.

मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी कामशेत येथे महायुतीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. या वेळी आमदार शेळके बोलत होते. खासदार बारणे, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, भाजपचे तालुकाध्यक्ष भाऊ गुंड, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजू खांडभोर यावेळी उपस्थित होते. मावळ लोकसभा मतदारसंघावर भाजपने जोरदार दावा केला होता. माजी राज्यमंत्री बाळा भेगडे लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी तीव्र इच्छुक होते. परंतु, मावळ मतदारसंघ शिवसेनेकडेच कायम राहिला आणि पुन्हा बारणे यांनाच उमेदवारी मिळाली.

हेही वाचा >>>पिंपरी : सहायक फौजदाराच्या मुलाची ‘यूपीएससी’ परीक्षेत यशाला गवसणी

भाजप कार्यकर्त्यांनी उमेदवारीसाठी आग्रही मागणी करणे, यात काहीही गैर नव्हते. पण, नेत्यांनी निर्णय घेतल्यानंतर आता तो विषय संपला आहे. देशाचा इतिहास घडवणारी ही निवडणूक आहे. त्यासाठी एकमेकांच्या विरोधात लढणारे आम्ही आता एका व्यासपीठावर आलो आहोत. महायुतीच्या नेत्यांप्रमाणेच आता कार्यकर्त्यांमध्येही एकमत होऊन खासदार बारणे यांना सर्वाधिक मताधिक्य मिळेल. महायुतीच्या विरोधात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांप्रमाणेच नेत्यांवरही कारवाई होईल, असा इशारा भाजपच्या भेगडे यांनी दिला.

राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके म्हणाले, की कोणत्या मुहूर्तावर मी आमदार झालो हेच मला कळत नाही. सांगितलेल्या मुहूर्तानुसार मी उमेदवारीअर्ज भरून आलो. पाच वर्षांत खूप अनुभवले आहे. करोनाचा काळ अनुभवला. पहाटेचा शपथविधी पाहिला. परत महाविकास आघाडी झाली. पुन्हा विरोधात बसलो. परत महायुतीमध्ये आलो. सर्वांसोबत सत्तेत आणि विरोधातही बसलो. हे सर्व करीत असताना मावळचा विकास या एकाच मुद्द्यासाठी आम्ही तडजोडी केल्या. मानापमान सहन केला. तालुक्याला न्याय देईल, विकास करेल त्यालाच पाठिंबा, एवढीच आपली भूमिका असते. अजित पवार यांचा शब्द आमच्यासाठी अंतिम आहे. त्यामुळे मावळात बारणे यांना आपल्यापेक्षाही अधिक मताधिक्य मिळेल, अशी ग्वाही आमदार शेळके यांनी दिली. बारणे यांनी गेल्या १० वर्षांत केलेल्या कामाचा लेखाजोखा द्यावा एवढीच माझी मागणी होती, त्याप्रमाणे त्यांनी तो दिला आहे. त्यामुळे आता कोणतीही तक्रार उरलेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.