भारतासह इतर अल्प उत्पन्न गटातील देशांसाठी करोना लशीचे तब्बल १० कोटी अतिरिक्त डोस तयार करणार असल्याची घोषणा सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियातर्फे मंगळवारी करण्यात आली. २०२१ पर्यंत भारत आणि इतर अल्प उत्पन्न गटातील देशांना लशीचा पुरवठा करण्याचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून ही निर्मिती करण्यात येणार आहे.

सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया, ग्लोबल अलायन्स ऑफ व्हॅक्सिन तसेच बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशन यांच्यातील सामंजस्य करारान्वये ही निर्मिती करण्यात येणार आहे. ऑगस्ट महिन्यात करण्यात आलेल्या घोषणेनुसार भारत आणि गरीब देशांसाठी करोना लशीचे १० कोटी डोस निर्माण करण्यात येणार होते, त्यात अतिरिक्त १० कोटी डोसनिर्मिती करण्यात येणार आहे. भारतासह इतर अल्प उत्पन्न गटांतील देशांमधील नागरिकांसाठी तीन डॉलर (भारतीय मूल्य २२१ रुपये) इतक्या कमी किमतीत ही लस उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला म्हणाले, सद्य:स्थितीत जगातील प्रत्येकाला लस उपलब्ध व्हावी यासाठी शासकीय आणि खासगी क्षेत्रातील कंपन्यांनी हातमिळवणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनच्या ३० कोटी अमेरिकन डॉलरच्या गुंतवणुकीमुळे लस उपलब्धतेचा मार्ग सोपा होईल.

‘मॉडर्ना’बाबत..

बोस्टन : यूएस नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅलर्जी अ‍ॅण्ड एन्फेक्शियस डिसिझेस (एनआयएआयडी) व अमेरिकन बायोटेक कंपनी मॉडर्ना यांच्यातर्फे संयुक्तरीत्या विकसित करण्यात येत असलेली कोविड-१९ वरील लस अधिक वयाच्या प्रौढांमध्ये तीव्र प्रतिकारशक्ती निर्माण करत असल्याचे तिच्या पहिल्या टप्प्यातील चाचणीत आढळले आहे.

‘एमआरएनए-१२७३’ ही प्रयोगात्मक लस ५५ वर्षांवरील व्यक्तींना देण्यात आली, तेव्हा त्यांच्या शरीराने तिला चांगला प्रतिसाद दिला, असे ‘न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन’मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात म्हटले आहे. एनआयएआयडीच्या संशोधकांच्या मते, जास्त वयाच्या प्रौढांना कोविड-१९ मुळे निर्माण होणाऱ्या गुंतागुंतीचा अधिक धोका असतो आणि हे लोक लसीकरणासाठी महत्त्वाचे असतात.

या लसीचा लोकसंख्येतील या विशिष्ट वर्गावर कसा परिणाम होतो हे समजून घेणे तिची सुरक्षा व परिणामकारकता मोजण्याचा महत्त्वाचा भाग आहे.

या लसीच्या पहिल्या टप्प्याच्या चाचणीला १६ मार्च २०२० रोजी सुरुवात झाली आणि त्यानंतर महिनाभराने अधिक वयाच्या प्रौढांचा समावेश करून तिची व्याप्ती वाढवण्यात आली.