आर्म फोर्स मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर लष्कराच्या सेवेत न येणाऱ्या विद्यार्थ्यांना यापुढे २५ लाख रुपये दंड करण्यात येणार आहे, अशी माहिती ‘आर्म फोर्स मोडिकल सव्र्हिस’चे डायरेक्टर जनरल एअर मार्शल डी. पी. जोशी यांनी दिली.
वानवडी येथील आर्म फोर्स मेडिकल कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या वैद्यकीय परिषदेच्या निमित्ताने घेतलेल्या पत्रकार परिषदेत जोशी यांनी वैद्यकीय सेवा व सुविधांबाबत माहिती दिली. आर्म फोर्स मेडिकल कॉलेजचे डायरेक्टर कमांडंट एअर मार्शल बी. केशव राव, डेप्युटी कमांडंट मेजर जनरल वेळू नायर आदी या वेळी उपस्थित होते.
लष्कराबरोबर करार करून एमबीबीएस किंवा इतर वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण करून नंतर लष्कराच्या सेवेत दाखल न होणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत लष्कराने गांभीर्याने निर्णय घेण्याचे ठरविले आहे, असे सांगून जोशी म्हणाले, की याबाबतचा अहवाल संरक्षण मंत्रालयाला पाठविण्यात आला आहे. लष्करातर्फे एमबीबीएस पूर्ण करून विद्यार्थी लष्कराच्या सेवेत येणार नसेल, तर त्याला २५ लाख रुपये भरावे लागतील. पदविका अभ्यासक्रम करून बाहेर पडल्यास १५ लाखांपर्यंत रक्कम भरावी लागेल. त्याचप्रमाणे पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पूर्ण करून बाहेर पडणाऱ्याला पाच ते २५ लाखांपर्यंतची रक्कम भरावी लागेल. लष्कराकडून प्रशिक्षण पूर्ण करायचे व देशाच्या सेवेसाठी लष्कराच्या कोणत्याही दलात सहभागी व्हायचे नाही, असे निदर्शनास आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
क्रीडा वैद्यकशास्त्र या नवा अभ्यासक्रम सुरू करण्याचा मानस असल्याचे सांगून ते म्हणाले, की याबाबत मेडिकल कौंसिल ऑफ इंडिया (एमसीआय) व राज्य सरकारच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून मान्यताही मिळाली आहे. ‘एमसीआय’कडून पाहणी झाल्यानंतर पुण्यामध्ये क्रीडा वैद्यकशास्त्राचा तीन वर्षांचा एमडी अभ्यासक्रम सुरू करता येईल. खेळाडूच्या निवडीपासून पुनर्वसनापर्यंतच्या सर्व बाबींचा या अभ्यासक्रमात समावेश असेल.
केंद्र शासनाने देशातील ४६ लष्करी रुग्णालयांचे अत्याधुनिकरण करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी नऊ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून त्यास मान्यता मिळाल्यानंतर पुढील कार्यवाहीस सुरुवात होईल, अशी माहितीही जोशी यांनी दिली.
संग्रहित लेख, दिनांक 6th Feb 2014 रोजी प्रकाशित
‘एएफएमएस’चा विद्यार्थी लष्करी सेवेत दाखल न झाल्यास २५ लाखांचा दंड – एअर मार्शल डी. पी. जोशी
आर्म फोर्स मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर लष्कराच्या सेवेत न येणाऱ्या विद्यार्थ्यांना यापुढे २५ लाख रुपये दंड करण्यात येणार आहे.
First published on: 06-02-2014 at 03:10 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Afms medical course mci fine students