नोंदणी केल्यानंतर अठ्ठेचाळीस तासांच्या आत गॅस सिलिंडर घरपोच देण्याचा गॅस कंपन्यांचा दावा फसवा असल्याची अनेक प्रकरणे सध्या पुढे येत आहेत. नोंदणीनंतर प्रत्यक्ष सिलिंडर मिळण्यासाठी चारशेहून अधिक तासांचा कालावधी लागत असल्याचे काही प्रकार समोर येत आहेत.
सिलिंडरची नोंदणी करण्याची पद्धत संगणकीकृत करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकाने गॅसची नोंदणी केल्यानंतर त्याबाबत कंपन्यांकडून ग्राहकाला ‘एसएमएस’वरून त्याबाबतची माहिती देण्यात येते. गॅसची नोंदणी झाल्यानंतर पुढील अठ्ठेचाळीस तासांमध्ये गॅस वितरीत केले जातात, असा दावा गॅस कंपन्यांकडून वेळोवेळी करण्यात येतो आहे. मात्र, वितरणाच्या व गॅस एजन्सीच्या पातळीवर सद्यस्थिती वेगळीच असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
वेळेवर सिलिंडरचा पुरवठा होत नसल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून वेळोवेळी करण्यात येत असतात. त्याचाच एक पुरावा शुक्रवारी समोर आला. सजग नागरी मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी सिलिंडरसाठी १७ जानेवारीला नोंदणी केली. त्यानंतर त्यांना कंपनीच्या वतीने ‘एसएमएस’ही आला. मात्र, त्यात संबंधित वितरकाने २९ डिसेंबपर्यंतची गॅसची मागणी पूर्ण केल्याचा उल्लेखही होता. याचाच अर्थ सुमारे २० दिवसांची ग्राहकांची मागणी अद्यापही पूर्ण झाली नसल्याचे त्यातून स्पष्ट होते. याबाबत वेलणकर म्हणाले की, या प्रकारामुळे नोंदणीनंतर अठ्ठेचाळीस तासांत सिलिंडर देण्याचा कंपन्यांचा दावा फसवा आहे. कंपनीकडून ‘एसएमएस’ येतो म्हटल्यावर सिलिंडर नोंदणीबाबतही त्यांच्याकडे नोंद असली पाहिजे. जानेवारी अखेपर्यंत सिलिंडर न देता, फेब्रुवारीमध्ये तेच सिलिंडर विनाअनुदानित किमतीला विकण्याचाही उद्देश या मागे असू शकतो, असा आरोपही वेलणकर यांनी केला आहे.