पुणे : पुण्यातील संगमवाडी पुलाजवळील जागेत आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. या कार्यक्रमाला भाजपचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील,आमदार माधुरी मिसाळ, सुनील कांबळे, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, चेतन तुपे, सुनील टिंगरे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, क्रीडा आयुक्त डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे, मनपा अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, तसेच आजी माजी पदाधिकारी देखील उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाषण करण्यास उभे राहताच, सभा मंडपातील काही नागरिकांनी साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झालाच पाहिजे,अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यावेळी पोलिस आणि उपस्थित नेतेमंडळींची चांगलीच तारांबळ उडाल्याचे पाहण्यास मिळाले. घोषणा देणार्‍या नागरिकांना पोलिसांनी शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र तरी देखील घोषणा सुरूच होत्या, घोषणा देणार्‍या नागरिकांचा पवित्रा लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अण्णाभाऊ साठे यांचा विजय असो, असे म्हणताच घोषणा देणारे नागरिक शांत झाले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच भाषण सुरू झाले आणि लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारक कसे असणार, याबाबत त्यांनी माहीती देखील दिली.

आणखी वाचा-…म्हणून कार्यक्रम अर्धवट सोडून खासदार डॉ. कोल्हे बाहेर पडले

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, क्रांतीगुरू लहुजी वस्ताद यांच्या आदर्शानुसार चालणारे सरकार असल्याने सर्वसामान्यांसाठी अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आज करण्यात आले आहे. मातंग समाज प्रामाणिक आणि कष्टाळू आहे, दिलेला शब्द पाळणारा आहे. बार्टीच्या धर्तीवर अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेची (आर्टी) स्थापना करून सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचे कार्य केले आहे. त्यामुळे मातंग समाजातील मुलांना आता उच्च शिक्षण घेता येईल. स्पर्धेच्या युगात या समाजाला इतर समाजाच्या बरोबर विकासात सहभागी करून घेण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. तसेच शासनाने नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात गड किल्ले, महापुरुषांच्या स्मारकासाठी तरतूद ठेवली आहे. नव्या पिढीला महापुरुषांच्या कार्य, बलिदानापासून प्रेरणा मिळावी यासाठी स्मारके उभारण्यात येत आहेत. भिडेवाडा येथे देखील सावित्रीबाई फुले यांचे स्मारक होत आहे. लहुजी वस्ताद यांच्या हातातील दांडपट्ट्याला शासनाने राज्य शस्त्राचा दर्जा दिला आहे. आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाच्या माध्यमातून मातंग समाजातील नव्या पिढीला प्रेरणा मिळण्यासोबत उच्च पदावर जाता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After cm eknath shindes speech started citizens demand to bharat ratna to anna bhau sathe svk 88 mrj