पिंपरी पालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या बदलीची चर्चा सुरू असतानाच सोमवारपासून ते पाच दिवसांच्या प्रशिक्षणासाठी रवाना होत आहेत. त्यामुळे अनेक तर्क-वितर्क लढवण्यात येत आहेत. दरम्यान, संभाव्य आयुक्त म्हणून ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर गायकवाड आणि रत्नागिरीचे जिल्हाधिकारी राजीव जाधव यांच्या नावांची दिवसभर चर्चा सुरू होती.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी प्रतिष्ठेचा विषय केल्याने आयुक्तांच्या बदलीची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आयुक्तांनी या चर्चेला थेट उत्तर दिले नसले तरी खंडनही केले नाही. शनिवारी ते दिवसभर पालिका सभेत बसून होते. त्यांची बदली होऊ नये, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. आयुक्तांच्या समर्थनार्थ मारूती भापकर यांच्या नेतृत्वाखाली पालिकेच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन झाले. सभा संपल्यानंतर आयुक्त सोमवारपासून प्रशिक्षणासाठी रवाना होत असल्याची माहिती पुढे आल्याने पुन्हा त्यांच्या बदलीच्या चर्चेने जोर धरला. यापूर्वीच्या बहुतांशी आयुक्तांची मुदतीपूर्व बदली झाली, तेव्हा ते प्रशिक्षणालाच गेले होते. शेखर गायकवाड आणि राजीव जाधव यांच्यापैकी एकाची आयुक्तपदी वर्णी लागणार असल्याची चर्चा होती. मात्र, त्यास अधिकृतपणे दुजोरा मिळू शकला नाही.