लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे. मात्र, त्याआधीच मावळमध्ये महायुतीमधील शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात चांगलीच जुंपली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदावर श्रीरंग बारणे यांनी माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी महायुतीचा धर्म पाळला नाही. स्थानिक काही कार्यकर्त्यांनी निवडणुकीत काम न केल्याचा आरोप त्यांनी केला. आता त्यांच्या आरोपाला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मावळचे आमदार सुनील शेळके यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘श्रीरंग बारणे यांनी अपयश लपवण्यासाठी आमच्यावर खापर फोडू नये’, असं शेळके यांनी म्हटलं आहे.

सुनील शेळके काय म्हणाले?

“अपयश लपवण्यासाठी कुणावर तरी आरोप करायचे किंवा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर खापर फोडण्याच काम श्रीरंग बारणे यांनी करू नये. जेणेकरून आपली नाराजी ही मतदारांमध्ये होती, हे आपल्याला मान्य करावे लागेल. मात्र, तरीही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी झोकून देऊन काम केलं आहे. हे देखील लक्षात ठेवलं पाहिजे”, असं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : मावळमध्ये निकालापूर्वीच महायुतीत वादाची ठिणगी; खासदार श्रीरंग बारणेंचा अजितदादांच्या राष्ट्रवादीवर आरोप, म्हणाले…

श्रीरंग बारणे काय म्हणाले होते?

“मावळ लोकसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी महायुतीचा धर्म पाळला नाही. निवडणुकीत काही कार्यकर्त्यांनी ताकदीने काम केलं नाही. ज्या कार्यकर्त्यांनी काम केलं नाही त्यांची यादी अजित पवार यांच्याकडे दिली आहे. जर सर्व कार्यकर्त्यांनी काम केलं असतं तर समोरच्या उमेदवाराचे डिपॉझिटही जप्त झालं असतं”, असं खासदार श्रीरंग बारणे यांनी म्हटलं होतं.

उमेश पाटील काय म्हणाले?

“मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी एका मुलाखतीत म्हटलं की, त्या ठिकाणच्या काही स्थानिक कार्यकर्त्यांनी मनापासून काम केलं नाही. त्या कार्यकर्त्यांची यादी त्यांनी अजित पवार यांना दिली आहे. मात्र, अजित पवार यांनीही स्वत: बैठक घेऊन कार्यकर्त्यांना कामाला लावलं होतं. बारामतीच्या निवडणुकीत ते व्यस्त असतानाही त्यांनी वेळ दिला होता. एवढं सर्व असताना महायुतीत तीन पक्ष एकत्र आहेत. त्यामुळे काही स्थानिक कार्यकर्त्यांत काही प्रमाणात नाराजी असू शकते. आमचे सर्वच पदाधिकारी या निवडणुकीत काम करत होते. सर्वच ठिकाणी जेथे-जेथे महायुतीचे उमेदवार आहेत, त्या ठिकाणी अशा पद्धतीचं थोडंफार उन्नीस बीस झालेलं असतं. ज्यावेळी आघाडी किंवा युतीच्या माध्यमातून निवडणुका लढवल्या जातात तेव्हा हे स्वीकारावं लागतं”, असं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते उमेश पाटील यांनी म्हटलं.