पिंपरी : काँग्रेसचे विभाजन होऊन राष्ट्रवादीची स्थापना झाली. तेव्हा काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टप्प्याटप्प्याने काँग्रेसची ताकद कमी होईल, असेच राजकारण केले आणि राष्ट्रवादीचे बळ वाढवले. आता शहरात काँग्रेसची वाताहात झाल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत, पुत्रप्रेमापोटी अजितदादांनी काँग्रेस नेत्यांची मनधरणी सुरू केली आहे.

मावळ लोकसभेसाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीचे उमेदवार म्हणून अजितदादांचे पुत्र पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवडच्या विकासाचे शिल्पकार म्हणून राष्ट्रवादीने अजित पवारांची प्रतिमा निर्माण केली असली, तरी येथील राजकारणाशी पार्थ यांचा काहीही संबंध आलेला नाही. त्यामुळे तूर्त अजित पवार हेच उमेदवार असल्यासारखे दिसत आहेत. शहरातील प्रमुखांच्या गाठीभेठी तसेच दूरध्वनीवरून संपर्क साधण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. पिंपळे निलख येथे काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांच्या घरी अजित पवार तासभर होते. शहरात काँग्रेसचा हक्काचा मतदार असल्याचे सांगत काँग्रेस कार्यकर्त्यांनी पार्थच्या प्रचारात सक्रिय सहभागी व्हावे, अशी विनंती त्यांनी साठे यांना केली.

मावळ मतदारसंघात राष्ट्रवादीला पािठबा देण्यावरून शहर काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह आहेत. वरिष्ठ पातळीवर झालेल्या निर्णयाप्रमाणे राष्ट्रवादीचा प्रामाणिकपणे प्रचार करण्याची एका गटाची भूमिका आहे. त्यानुसार, जुनी उणीदुणी न काढता आघाडी धर्म पाळण्याचे आवाहन शहराध्यक्ष सचिन साठे यांनी केले आहे. दुसऱ्या गटाचा राष्ट्रवादीला बळ देण्यास विरोध आहे. राष्ट्रवादीने काँग्रेसचे अतोनात नुकसान केले असल्याने त्यांच्याकडून पुढील सहकार्याची हमी आताच घेतली पाहिजे, अशी या गटाची भावना आहे.

राष्ट्रवादीविषयी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत. पुढचा सर्व विचार करून राष्ट्रवादीला मदत करावी. राष्ट्रवादी वाढवताना काँग्रेसचे खच्चीकरण होता कामा नये. आगामी विधानसभा आणि पालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसला सहकार्य करण्याचे राष्ट्रवादीचे धोरण असावे. यापुढे तरी राष्ट्रवादीने कुरघोडीचे राजकारण करू नये, अशी काँग्रेस कार्यकर्त्यांची माफक अपेक्षा आहे.

– मनोज कांबळे, माजी प्रदेशाध्यक्ष एन.एस.यू.आय.

राष्ट्रवादीकडून काँग्रेस कार्यकर्त्यांचा योग्य सन्मान राखला गेला पाहिजे. तशी हमी अजित पवारांनी दिली आहे. पुढील आठवडय़ात दोन्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक होणार आहे.

– सचिन साठे, शहराध्यक्ष, पिंपरी काँग्रेस