scorecardresearch

सर्वपक्षीय राजकीय कुचंबणा

आगामी निवडणूक त्रिसदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार असून प्रारूप प्रभाग रचनेत मोठे फेरबदल झाल्याने सर्वपक्षीय नगरसेवकांची राजकीय कुचंबणा झाल्याचे चित्र आहे.

त्रिसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे विद्यमान चार नगरसेवकांपैकी एका नगरसेवकाला पुन्हा संधी नाही

पुणे : आगामी निवडणूक त्रिसदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार असून प्रारूप प्रभाग रचनेत मोठे फेरबदल झाल्याने सर्वपक्षीय नगरसेवकांची राजकीय कुचंबणा झाल्याचे चित्र आहे. त्रिसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे विद्यमान चार नगरसेवकांपैकी एका नगरसेवकाला पुन्हा संधी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पक्षांतर, अपक्ष म्हणून निवडणूक लढविणे अशा पर्यायांची चाचपणी नगरसेवकांकडून सुरू झाली आहे. दरम्यान, प्रस्थापित नगरसेवकांनी त्यांचे प्रभाग सुरक्षित केल्याचे चित्र असून काहींचे प्रभाग बदलणार असले तरी त्यांना लगतच्या प्रभागातून उमेदवारी मिळेल, अशी खात्री त्यांच्याकडून दिली जात आहे.

महापालिकेची निवडणूक त्रिसदस्यीय प्रभाग (तीन नगरसेवकांचा एक प्रभाग) या पद्धतीने होणार आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार शहरात ५८ प्रभागातून १७३ नगरसेवक निवडून येणार आहेत. यातील ५७ प्रभाग प्रत्येकी तीन नगरसेवकांचे तर एक प्रभाग दोन नगरसेवकांचा असेल. सध्या महापालिकेत ४२ प्रभागातून १६४ नगरसेवक निवडून आले आहेत. ४२ प्रभागापैकी ३९ प्रभाग चार नगरसेवकांचा एक या पद्धतीचा तर तीन प्रभाग तीन नगरसेवकांचा एक या पद्धतीचा आहे. महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या अकरा गावांचा मिळून एक प्रभाग असून या प्रभागातून दोन नगरसेवक निवडून आले आहेत.  आगामी निवडणूक तीन नगरसेवकांचा एक प्रभाग पद्धतीने होणार असल्याने एका नगरसेवकाला पुन्हा संधी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. याचा सर्वाधिक फटका सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांना बसणार आहे.

तीन नगरसेवकांना संधी मिळणार असल्याने एका उमेदवाराला पुन्हा संधी मिळणार नसल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे एकमेकांचा पत्ता कापण्यासाठीची स्पर्धाही नगरसेवकांमध्ये सुरू झाली आहे. काही विद्यमान नगरसेवकांनी बदलती प्रभाग रचना लक्षात घेऊन लगतच्या प्रभागातून निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली असली तरी त्या प्रभागातील नगरसेवक आपल्याच पक्षातील नगरसेवकांना नव्या प्रभागातून निवडणूक लढवू देतील का, असा प्रश्नही उपस्थित झाला आहे. त्यामुळे पक्षांतर करण्याबरोबरच अपक्ष पद्धतीने निवडणूक लढविण्याच्या पर्यायांची चाचपाणही सुरू झाली आहे. प्रभाग पद्धतीच्या या तिढय़ामुळे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपुढील डोकेदुखीही वाढणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे निवडणुकीत बंडखोरी होण्याची शक्यताही वाढली आहे.

या नगरसेवकांची अडचण

प्रभाग फेररचना नीलिमा खाडे, धीरज घाटे, गायत्री खडके,आदित्य माळवे, आनंद रिठे, अनित कदम, सरस्वती शेंडगे, राजेश येनपूरे, आरती कोंढरे, अजय खेडेकर, मनिषा लडकत, हरिदास चरवड, हेमा नवले, नीता दांगट, राजू लायगुडे, स्मिता वस्ते, आश्विनी भागवत, वीरसेन जगताप, संगिता ठोसर, रंजना टिळेकर, जयंत भावे,  योगेश समेळ,  मंगला मंत्री, लता धायरकर, मारुती तुपे, कालिंदा पुंडे, राजश्री शिळीमकर, अल्पना वर्पे, डॉ. श्रद्धा प्रभुणे  या भाजपच्या नगरसेवकांबरोबरच विशाल तांबे, दत्तात्रय धनकवडे, किशोर धनकवडे, दिलीप बराटे, युवराज बेलदरे, स्मिता कोंढरे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांसाठी अडचणीची ठरली आहे. रिवद्र धंगेकर, अरिवद शिंदे या काँग्रेसच्या नगरसेवकांनाही प्रभाग बदलावा लागण्याची शक्यता आहे. मात्र नवी प्रभाग रचना सुरक्षित असून निवडणुकीसाठी अडचण येणार नाही, असा दावा या सर्वानी केला आहे. महापौर मुरलीधर मोहोळ आणि सभागृहनेता गणेश बीडकर यांना दुसऱ्या प्रभागातून निवडणूक लढवावी लागणार आहे.

नगरसेवकांकडूनही आक्षेप

प्रभाग रचनेत मोठे फेबदल करण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भारतीय जनता पक्षाच्या नगरसवेकांकडूनही प्रारूप प्रभागावर मोठय़ा प्रमाणावर हरकती-सूचना नोंदविण्यात आल्या आहेत. प्रभाग चुकीच्या पद्धतीने केल्याचा आणि भौगोलिक सीमा लक्षात न घेता प्रभाग रचना करण्यात आल्याचा दावा या हरकती-सूचनांमध्ये करण्यात आला आहे. अनुकूल भाग जोडावा, प्रतिकूल भाग वगळावा, अशी मागणीही अनेक नगरसेवकांनी केली आहे. 

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: All party political intrigue member ward system existing corporators chance ysh

ताज्या बातम्या