दहावीच्या जुलैमध्ये होणाऱ्या पुनर्परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून आता २४ जूनपर्यंत नियमित शुल्कासह अर्ज भरता येणार आहे. ही परीक्षा १८ जुलैला सुरू होणार असल्याचे राज्यमंडळाकडून जाहीर करण्यात आले आहे.
दहावीची पुनर्परीक्षा ऑक्टोबर ऐवजी जुलैमध्ये घेण्यास शासनाने गेल्या वर्षीपासून सुरुवात केली. या परीक्षेचे अर्ज भरण्याची सुरूवात १० जूनपासून झाली, त्यासाठी २० जून अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना अर्ज भरता आले नाहीत. त्यामुळे मुदतवाढ देण्याची मागणी शाळा आणि विद्यार्थ्यांकडून करण्यात येत होती. या पाश्र्वभूमीवर अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्याचे राज्यमंडळाने जाहीर केले आहे.
आता विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह २४ जूनपर्यंत अर्ज भरता येणार आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या शाळांच्या माध्यमातून अर्ज भरावेत असे आवाहन राज्यमंडळाने केले आहे.
दहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेले किंवा श्रेणीसुधार करू इच्छिणारे विद्यार्थी या परीक्षेसाठी बसू शकतात. राज्यमंडळाच्या http://www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अधिक माहिती आणि अर्ज उपलब्ध आहेत.