भोसरीच्या तुकारामनगर भागामध्ये तीस ते चाळीस गुंडांच्या टोळक्याने शुक्रवारी रात्री हातात धारदार शस्त्रे घेऊन धुमाकूळ घालत वाहने व दुकानांची तोडफोड केली. गुंडांच्या टोळीमधील वादातून हा प्रकार झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. भोसरी पोलिसांनी या प्रकरणी शनिवारी पाच आरोपींना ताब्यात घेतले. या प्रकारानंतर तुकारामनगर भागामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
भोसरीच्या दिघी रस्ता भागात असलेल्या तुकारामनगरमध्ये रात्री साडेआठच्या सुमारास सुमारे वीस दुचाकीवरून तीस ते चाळीस गुंडांचे टोळके आले. या गुंडांच्या हातामध्ये तलवारी, कोयते, लोखंडी रॉड यांसारखी हत्यारे होती. त्यांनी दुचाकीवरून उतरताच हत्यारे उगारीत या भागामध्ये प्रचंड धुमाकूळ घातला. दिसेल त्या वाहनाची, दुकानाची व साहित्याची तोडफोड करण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यामुळे नागरिक घाबरून इतरत्र पळून गेले. गुंडांच्या या टोळक्याने पाच चारचाकी वाहनांसह सुमारे वीस गाडय़ांचे नुकसान केले. त्याचप्रमाणे या भागातील दुकानांचीही तोडफोड केली. या प्रकारानंतर या भागामध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली असून, पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.
चिंचवडच्या मोहननगर भागामध्ये राहणाऱ्या एका गुंडाला तुकारामनगरमधील गुंडांनी मारहाण केली होती. या मारहाणीचा बदला घेण्यासाठी हा प्रकार झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तोडफोड करणारे गुंड या भागातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. त्याच्या आधाराने पोलिसांकडून या टोळक्याचा शोध घेण्यात येत आहे. या प्रकरणी आतापर्यंत पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी करण्यात येत आहे. सध्याकाळी उशिरापर्यंत कोणालाही अटक करण्यात आली नव्हती.
संग्रहित लेख, दिनांक 11th Oct 2015 रोजी प्रकाशित
भोसरीत गुंडांच्या टोळक्याकडून सशस्त्र धुमाकूळ; वाहनांची तोडफोड
पाच आरोपी पोलिसांच्या ताब्यात
Written by अपर्णा देगावकर

First published on: 11-10-2015 at 04:00 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Armed rampage of gangsters gang in bhosari vehicles damaged