करोना विषाणूच्या संसर्गाची पाश्र्वभूमी लक्षात घेता यंदा आषाढीची पायी वारी आणि नेहमीचे पालखी सोहळे रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. परंपरा कायम ठेवण्यासाठी केवळ संतांच्या पादुका मोजक्या वारकऱ्यांसह एकाच दिवसात दशमीला विमान, हेलिकॉप्टर किंवा बसने थेट पंढरपूरला पाठविण्याचे ठरविण्यात आले आहे. शासनाची ही भूमिका राज्यातील प्रमुख संस्थानचे प्रतिनिधी आणि संप्रदायातील बहुतांश मंडळींनीही अखेर मान्य केली आहे. ‘लोकसत्ता’नेही सातत्याने हीच भूमिका घेऊन वेळोवेळी याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले होते.

करोनाच्या संकटामध्ये आषाढीची पायी वारी आणि पालखी सोहळ्यांच्या आयोजनाबाबत गेल्या महिन्यापासून चर्चा आणि बैठका सुरू होत्या. शासनाच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १५ मे रोजी बैठक घेतली होती. त्यात संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराममहाराज संस्थानसह राज्यातील प्रमुख संस्थानांनी आषाढी वारीबाबत प्रस्ताव ठेवले होते. भव्य प्रमाणात सोहळा नको, अशीच सर्वाची भूमिका असली, तरी काही प्रमाणात मतभेद होते. त्यावर शासनाने निर्णय राखून ठेवला होता. शुक्रवारी (२९ मे) पवार यांच्या उपस्थितीत पुन्हा बैठक झाली. त्यात पायी वारी आणि नेहमीप्रमाणे पालखी सोहळे न काढण्याचा निर्णय झाला.

जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी परवानगी दिलेल्या संस्थानच्या पादुका राज्य शासनाच्या वतीने विमान, हेलिकॉप्टर किंवा बसने दशमीला पंढरपूरला पोहोचविण्यात येतील. पादुकांसोबत अल्पसंख्येने जाणाऱ्यांची यादी संस्थानांकडून प्रशासनाला दिली जाईल. प्रशासनाची परवानगी घेतल्याशिवाय राज्यातून कोणतीही पालखी किंवा दिंडी निघणार नसल्याचेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले. शासनाच्या या निर्णयाने संप्रदायाकडून स्वागत करण्यात आले.

प्लेगची साथ ते करोना..

पंढरीच्या पायी वारीला शेकडो वर्षांचा इतिहास आहे. त्यानंतर संतांच्या पालख्यांचा त्यात समावेश होत गेला. या पालख्यांसमवेत वारकरी मोठय़ा संख्येने पायी वारी करतात. माउली आणि तुकोबांच्या सोहळ्यांमध्येच १२ ते १४ लाखांवर वारकरी सहभागी असतात. पालखी सोहळ्यामध्ये यंदा प्रथमच खंड पडणार आहे. एकूण वारीच्या परंपरेतही खंड पडलेला नाही. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांनी याबाबत सांगितले, की प्लेगच्या साथीमध्येही वारकऱ्यांनी पायी वारी केली. पण, यंदाची स्थिती अगदीच निराळी आहे.

संतांची वारी कायम ठेवून शासनाच्या वतीने विमान, हेलिकॉप्टर किंवा बसने पादुका पंढरीला पाठविण्यात येतील. आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये, ही संतांची शिकवण आहे. त्यानुसार संप्रदायातूनही सकारात्मक भूमिका मांडण्यात आली आहे. वारकरी आणि इतरांनीही पंढरीच्या विठ्ठलाचे दर्शन यंदा घरातूनच घ्यावे.

– अजित पवार, उपमुख्यमंत्री