दूषित पाण्यावाटे पसरणाऱ्या हगवण, कावीळ आणि विषमज्वरासह गॅस्ट्रोच्या रुग्णांची पुण्यातील संख्या लक्षणीय असून या दिवसांत बाहेरील पाणी आणि थंड पेये पिण्याचे प्रमाण वाढत असल्यामुळे जलजन्य आजारांमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे.
पालिकेच्या आकडेवारीनुसार गेल्या दोन महिन्यांत शहरात हगवण, कावीळ आणि विषमज्वराचे १६४ रुग्ण आढळले आहेत, तर एप्रिलमध्ये पाच दिवसांत या तीन आजारांचे ११ रुग्ण सापडले आहेत. ही केवळ नोंद झालेली आकडेवारी आहे. आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडील जलजन्य आजारांची आकडेवारी पाहता पुण्याच्या ग्रामीण भागात जानेवारी व फेब्रुवारीमध्ये हगवणीच्या आढळलेल्या रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. या कालावधील पुणे ग्रामीणमध्ये हगवण, गॅस्ट्रो, विषमज्वर आणि कावीळ या चार आजारांचे एकूण १४,४६६ रुग्ण सापडले. त्यातील सर्वाधिक म्हणजे १३,७३९ रुग्ण हगवण व अतिसाराचे आहेत, तर ६४१ रुग्ण विषमज्वराचे आहेत. विशेष म्हणजे पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांच्या गुणवत्तेच्या अहवालानुसार फेब्रुवारीत या भागातील १३ टक्के पाणी नमुने दूषित आढळले आहेत.
गॅस्ट्रोएंटेरॉलॉजिस्ट डॉ. संजय कोलते म्हणाले, ‘उन्हाळ्यात जलजन्य आजारांमध्ये वाढ होते. बाहेरील पाणी व थंड पेये, त्यात वापरलेला बर्फ याद्वारे दूषित पाणी पोटात जाऊ शकते. यात ‘बॅसिलरी डिसेंट्री’ आणि कॉलरा हे आजार प्रामुख्याने आढळतात व जुलाब हे या दोन्हीचे प्रमुख लक्षण असते. मोठय़ा प्रमाणात जुलाब होऊन काही तासातच रुग्णांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ शकते आणि त्यामुळे रुग्णाच्या मूत्रपिंडावर ताण येऊन धोका निर्माण होतो. त्यामुळे साध्या औषधाने बरे न होणारे व कमी वेळात वारंवार होणारे जुलाब, पोटात पेटके येऊन दुखणे, उलटय़ा होणे, जुलाब वा उलटय़ांमध्ये रक्त जाणे या लक्षणांमध्ये त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.’
विषमज्वरातही जुलाब, ताप, पोटात पेटके येणे अशी लक्षणे दिसतात तर काविळीत (हिपेटायटिस ‘ए’ व ‘इ’) अन्नावरील वासना जाणे, मळमळ अशी लक्षणे दिसून पुढे कावीळ होते. हगवण, ताप, मळमळ, खावेसे न वाटणे या लक्षणांमध्ये वेळीच विषमज्वर वा काविळीची शक्यता पडताळून पाहावी, असेही डॉ. कोलते यांनी सांगितले.

काय काळजी घ्यावी?
– उघडय़ावरील अन्न-पाणी शक्यतो टाळा.
– अनेकदा बाटलीबंद पाण्याचीही खात्री देता येत नसल्यामुळे घरच्या वा उकळलेल्या पाण्याची बाटली नेहमी बरोबर ठेवा.
– थंड पेये वा उसाचा रस प्यायल्यास त्यात बर्फ टाळा.

Strawberry Season end due to Water Shortage
पाण्याअभावी स्ट्रॉबेरीचा हंगाम आटोपला
three thousand families staying near waldhuni river boycotting lok sabha election, construction within river bed
कल्याणमध्ये वालधुनी नदी परिसरातील तीन हजार कुटुंबीयांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार
Breakfast Recipe
Breakfast Recipe : उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी बनवा मुगडाळीचा पौष्टिक नाश्ता, जाणून घ्या ही हटके रेसिपी
Stray animals suffering from dehydration due to heat 316 complaints in six days in Mumbai and Thane
उष्णतेमुळे भटक्या प्राण्यांना निर्जलीकरणाचा त्रास, मुंबई, ठाण्यामध्ये सहा दिवसांत ३१६ तक्रारी