रोहित पक्ष्याच्या आगमनाची प्रतीक्षा, तपकिरी रंगाचा करकोचा हे आकर्षण

तानाजी काळे

Due to summer the price of lemon continues to increase
उन्हामुळे लिंबाची दरवाढ कायम
All the Chief Executive Officers of the Zilla Parishad were given instructions regarding the recruitment of teachers Pune print news
शिक्षक भरतीची पुढील प्रक्रिया कधीपासून? शिक्षण विभागाने काय सांगितले?
Radio images of the Sun obtained by scientists pune news
शास्त्रज्ञांनी मिळवली सूर्याच्या रेडिओ प्रतिमा
seven injured after machinery in trailer
लष्कर भागात मोटारीची दहा दुचाकींना धडक; दुचाकीस्वार तरुण जखमी

इंदापूर : उजनी जलाशय शंभर टक्के भरल्याने नोव्हेंबर- डिसेंबरमधील गुलाबी थंडीमध्ये दरवर्षी न चुकता उजनीचा हक्काचा पाहुणचार घेण्यासाठी येणाऱ्या रोहित पक्ष्यांच्या आगमनाला विलंब होणार आहे. मात्र, त्यांची जागा देखण्या तपकिरी डोक्याच्या करकोचा या पक्ष्यांनी घेतली आहे. उजनी जलाशयावर या पक्ष्यांची मांदियाळी असून तपकिरी रंगाच्या करकोचाचे चित्र आपल्या कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त करण्यासाठी पक्षी अभ्यासक आणि छायाचित्रकारांची लगबग दिसू लागली आहे.

गुलाबी थंडीमध्ये उजनीच्या काठावर पाहुण्या पक्ष्यांचे वेध लागतात. शंभर टक्के भरल्यामुळे सध्या उजनी धरणात काठोकाठ पाणी आहे. रोहित पक्ष्यांना अन्न शोधण्यासाठी लागणारी पाणथळ जागा उजनी काठावर उपलब्ध नसल्यामुळे रोहित पक्षी येण्यासाठी यावर्षी तब्बल तीन महिने प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे पक्षीनिरीक्षक अजिंक्य घोगरे यांनी सांगितले.

उजनी जलाशयावर भिगवण ते कांदलगाव दरम्यान अनेक जाती-प्रजातीच्या पक्ष्यांनी गर्दी केली असून पक्षी निरीक्षणाचा आनंद लुटण्यासाठी अनेक पक्षी निरीक्षक, हौशी छायाचित्रकार व निसर्ग अभ्यासकांची पावले आता उजनीकडे वळू लागली आहेत. देशोदेशीच्या सीमा पार करून आलेले रोहित, तपकिरी डोक्याचे करकोचे, राखी बगळे, असे विविध पक्षी उजनी धरणाला एक सौंदर्य बहाल करतात. निसर्गदत्त पक्षी वैभवाने नटलेल्या इंदापूर तालुक्यामध्ये विणीच्या हंगामासाठी देशोदेशीच्या सीमा पार करून उजनीच्या पाहुणचारासाठी येणारे पक्षी इंदापूरकरांना आणि उजनी परिसरामध्ये वावरणाऱ्या लोकांना आता नवे राहिलेले नाहीत. हिवाळा स्थिरावल्यावर पक्षी निरीक्षकांसह आबालवृद्धांना रोहित पक्ष्यांच्या आगमनाचे वेध लागतात. थंडी वाढल्यानंतर एक दिवस हे पक्षी येतात .आणि हा परिसर गजबजून जातो. त्यांच्या कवायती सुरू होतात आणि मग पक्षी आले, अशी हाक उठते. यावर्षी रोहित पक्ष्यांना विलंब होणार असला तरी उजनी जलाशयावर माशांची शिकार करणारे मोरघार, ब्राऊन हेडेड गल व अन्य पक्ष्यांच्या सुरू झालेल्या कसरती पक्षी निरीक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

चार दशकांचे कालचक्र

उजनीच्या परिसरामध्ये पक्ष्यांच्या आवराआवरीची तयारी सुरू होताच या पक्ष्यांची लगबग उजनी जलाशयावर जाणवते. विखुरलेले पक्षी एकत्र येतात. त्यांच्या पिल्लांच्या याठिकाणी कवायती सुरू करून मायदेशीच्या प्रवासासाठी त्यांना सक्षम केले जाते आणि अचानकपणे पक्षी एखाद्या भल्या पहाटे रवाना होतात. पुन्हा उजनीच्या परिसर रिक्त होतो. पक्षी येतात आणि जातात. त्यांचे हे कालचक्र गेली चार दशके उजनीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू आहे. त्यांचा दिनक्रम आणि येण्या-जाण्याच्या तारखा लिखित नसल्या तरी या परिसरामध्ये वावरणाऱ्या लोकांच्या मनामध्ये त्या घर करून आहेत.