पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजप आणि विरोधक आमनेसामने

बाणेर येथील कचरा प्रक्रिया प्रकल्प स्थलांतरित करण्याच्या भारतीय जनता पक्षाच्या आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांच्या मागणीमुळे सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि महापालिकेतील विरोधक आमने-सामने आले आहेत. भारतीय जनता पक्षाची ही मागणी चुकीची असून प्रकल्पाला भाजपने विरोध करू नये, अशी मागणी विरोधी पक्षांकडून करण्यात आली आहे.

[jwplayer gLyhqAeU-1o30kmL6]

बाणेर येथे महापालिकेच्या मालकीच्या जागेत असलेला नोबेल एक्सचेंज एन्व्हायरमेंट सोल्युशन कंपनीच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे काम करारनाम्यानुसार होत नसल्यामुळे तो कचरा प्रक्रिया प्रकल्प स्थलांतरित करावा किंवा योग्य पद्धतीने चालविण्यात यावा, अशी मागणी बाणेर परिसरातील स्थानिक नागरिकांनी केली. बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा (बिल्ड ऑपरेट ट्रान्सफर- बीओटी) या तत्त्वावर हा कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. प्रक्रिया प्रकल्पाबाबत स्थानिक नागरिकांच्या तक्रारी असल्यामुळे कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या आमदार प्रा. मेधा कुलकर्णी आणि महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी प्रकल्पाला भेट दिली.

या प्रकल्पातून किती वीज आणि गॅस निर्मिती झाली हे प्रशासनाने जाहीर करावे, प्रकल्पाची उभारणी करताना पर्यावरण आणि अन्य बाबींची तपासणी करण्यात आली नाही, अशा तक्रारी स्थानिक नागरिकांकडून करण्यात आल्या. त्यानंतर या संदर्भातील कायदेशीर बाबी तपासून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले होते. मात्र भाजपच्या आमदारांकडून ही मागणी करण्यात आल्यामुळे या प्रकल्पावरून वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसकडून या मागणीला विरोध करण्यात आला आहे.

‘प्रभागातील कचरा प्रभागातच जिरविण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडून स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र त्यांच्याच पक्षाच्या आमदार या प्रकल्पाला विरोध करून तो बंद करण्याची मागणी करीत आहेत. हे चुकीचे आहे,’ असे विरोधी पक्षनेता, राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे आणि काँग्रेसचे गटनेता अरविंद शिंदे यांनी स्पष्ट केले. शहरातील कचरा प्रक्रिया प्रकल्पांना विरोध होण्यास सुरुवात झाली, तर उपनगरामध्ये कचरा प्रक्रिया प्रकल्प कसे उभे रहातील. बाणेर येथील या कचरा प्रक्रिया प्रकल्पामध्ये दीडशे टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. प्रक्रियेनंतर तयार झालेले रसायन तळेगाव येथे नेऊन त्यापासून साडेपाच हजार क्युबीक मेट्रीक सीएनजी गॅस तयार करण्यात येतो. त्यामुळे कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणाऱ्या आणि योग्य पद्धतीने सुरू असलेल्या या प्रकल्पाला विरोध करणे चुकीचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

[jwplayer pqdTtL1f-1o30kmL6]