पुण्यातील शिवाजीनगर येथे करोनाबाधितांवर उपचारांसाठी उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड सेंटरमधील आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या ठिकाणी उपचार घेत असलेली एक तरुणी गायब झाली आहे. गेल्या २७ दिवसापांसून घरच्यांशी संवाद नसल्याने तसेच प्रशासनाने मुलगी आमच्याकडे नसल्याचे सांगत हात वर केल्याने तिची आई कोविड सेंटरबाहेर धरणं आंदोलनास बसली आहे. यावरून भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे. “मुख्यमंत्री म्हणतात ‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’, मग राज्याचे प्रमुख म्हणून राज्याच्या कुटुंबाची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची नाही का?,” असा सवाल वाघ यांनी केला.

“मुख्यमंत्री म्हणतात ‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’, मग राज्याचे प्रमुख म्हणून राज्याच्या कुटुंबाची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची नाही का? पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमधून गायब झालेल्या लेकीसाठी तिची माय आर्त हाक देतेय. अशा कित्येकींचा आवाज ‘मातोश्री’पर्यंत कधी पोहोचणार?,” असा सवालही वाघ यांनी केला. “प्रिया गायकवाड पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमधून गायब झाली. तिच्या आईने लेकीच्या शोधासाठी कोविड केंद्राबाहेर उपोषण केलं. घडलेली घटना अत्यंत धक्कादायक असून वारंवार मागणी करूनही एसओपीबाबत निर्णय घेतला जात नाही हे आणखी चीड आणणारं आहे. किमान ‘मातोश्री’वर बसून का होईना, पण त्यांनी या घटनांची गांभीर्याने दखल घेऊन कडक कारवाई करायला हवी.” असंही त्या म्हणाल्या.

काय आहे प्रकरण?

पुण्यात वाढत्या करोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर शहरातील शिवाजीनगर भागात जम्बो कोविड केअर सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. या कोविड सेंटरमध्ये प्रिया गायकवाड नामक तरुणी उपचारासाठी दाखल झाली होती. मात्र, आज २७ दिवस उलटून गेले तरी देखील या मुलीशी तिच्या कुटुंबियांचा संवाद झालेला नाही. यामुळे शंका निर्माण झाल्याने तसेच प्रशासन याबाबत व्यवस्थित माहिती देत नसल्याने या मुलीच्या कुटुंबीयांनी कोविड सेंटर बाहेर धरणं आंदोलन सुरु केलं आहे.

कोविड सेंटरमधून गायब झालेल्या तरुणीची आई रागिणी सुरेंद्र गमरे यांच्याशी संवाद साधला असता त्या म्हणाल्या, “माझी मुलगी रागिणी हिला २९ ऑगस्ट रोजी शिवाजीनगर येथील कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर संध्याकाळी येथून फोन आला की, तुमची मुलगी काहीही ऐकत नाही, त्यामुळे तुम्ही येथे यावं. त्यानंतर मी येथे आले आणि माझं डॉक्टरांशी बोलणं झालं,” “डॉक्टर म्हणाले मुलीला १३ सप्टेंबरला डिस्चार्ज देण्यात येईल, तेव्हा तुम्ही पुन्हा रूग्णालयात यावं. त्यानुसार मी १३ तारखेला मुलीला नेण्यासाठी पुन्हा येथे आले मात्र, तुमची मुलगी आमच्याकडे उपचारासाठी नाही, असं उत्तर मला इथं देण्यात आलं. त्यानंतर इथल्या व्यवस्थापनाकडून मी माझ्या मुलीबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी उडवाउडवीची उत्तर दिली. माझ्या मुलीचं काय झालं असेल हा प्रश्न मला सारखा सतावत आहे. आज २७ दिवस झाले तरी माझं तिच्याशी बोलणं झालेलं नाही, त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनीच यामध्ये लक्ष घालून माझी मुलगी मला मिळून द्यावी,” अशी विनंतीही त्यांनी केली.

“संबधित मुलीच्या प्रकरणाची माहिती आम्ही घेतली आहे. या कोविड सेंटरचे काम त्यावेळी लाईफ लाईन संस्थेकडे देण्यात आलं होतं. त्यामुळं त्यांच्याकडून माहिती मागविली आहे. तसेच महिलेच्या कुटुंबीयांसोबत अधिकारी चर्चा करीत आहेत. या प्रकरणाचा अहवाल प्रशासन आणि पोलिसांनादेखील पाठविण्याच्या सूचना संस्थेला देण्यात आल्या आहेत,” असं या प्रकरणावर बोलताना महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल म्हणाल्या,