मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना व भाजपा एकत्र येणार असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहे. राजकीय वर्तुळातही याबद्दल बोललं जात आहे. मात्र, दोन्ही पक्षांकडून यावर अद्याप अधिकृतपणे भूमिका मांडण्यात आलेली नव्हती. अखेर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुंबई महापालिकेत मनसेसोबत युती करणार का? या दीर्घकाळापासून चघळल्या जात असलेल्या प्रश्नाला उत्तर दिलं. त्याचबरोबर युतीसाठी एक अटही घातली आहे.

पुण्यात माध्यमांशी बोलताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील म्हणाले, “मी वारंवार याबद्दलची भूमिका मांडली आहे. राज ठाकरे असो वा मनसे यांच्याबद्दल आदराने म्हटलेलं आहे. मी एक वाक्य दरवेळी म्हटलं आहे की, जोपर्यंत मनसे परप्रांतीयांबद्दलची भूमिका बदलत नाही. बदलत नाही म्हणताना आम्ही काही स्थानिक लोकांना नोकऱ्या देऊ नका असं म्हटलेलं नाही. स्थानिक लोकांना ८० टक्के नोकऱ्या द्या, असा कायदाच आहे. त्यामुळे नव्यानं भांडण्याचं कारण नाही. कायदाच आहे. शेवटी तुमचा (मनसे) कशाला विरोध आहे? परप्रांतियांनी टॅक्सी चालवण्याला, रिक्षा चालवण्याला की व्यवसाय करण्याला विरोध आहे का? मग देशातल्या सर्व राज्यांत मराठी भाषिक आहेत. जबलपूर, इंदौर सारख्या शहरात लाख लाख मराठी आहेत. अशा प्रकारे हा देश एक असताना, पोट भरण्यासाठी आलेल्यांना विरोध करणं तोही संघर्ष करणं आम्हाला मान्य नाही. आमचा राष्ट्रीय पक्ष आहे. मी राज ठाकरे यांची स्तुती करता करता, मनसे अनेक प्रश्न सोडवतात. पण जोपर्यंत ते परप्रातियांबद्दल भूमिका बदलत नाहीत, तोपर्यंत त्यांची आमची युती होऊ शकत नाही,” असं चंद्रकांत पाटील स्पष्ट केलं. “युतीबद्दल अजून तरी विषय आलेला नाही. मी वारंवार तुमच्या माध्यमातूनच मांडतोय. ज्यांचा त्यांच्यासोबत संवाद आहेत, ते लोक चर्चा करतील, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

रश्मी ठाकरेंना पत्र: “माझ्यासाठी विषय संपला” 

“माझ्या दृष्टीने विषय संपला आहे. मी फक्त वहिनींना तुम्ही सुसंस्कृत महिला संपादक असताना ही भाषा तुमच्या नावाला चिकटतेय. असं म्हणून शेवटी असं म्हटलं होतं की, पण तुम्हाला जर ती भाषा चालणार असेल, तर शुभेच्छा. आता काय चाललंय हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे आमच्या दृष्टीने हा विषय संपला आहे,” असं म्हणत पाटील यांनी रश्मी ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रावर अधिकच बोलणं टाळलं.