३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्यसाठय़ांवर छापे

नव्या इंग्रजी वर्षांचे स्वागत करण्यासाठी ३१ डिसेंबरला रात्री शहरासह जिल्ह्य़ात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. कार्यक्रमांमध्ये मद्यविक्री देखील सर्रासपणे केली जाते. परंतु, मद्यविक्री परवाना नसताना मद्यविक्री केल्यास कार्यक्रमांचे आयोजक आणि संबंधित जागामालक या दोघांवरही कारवाई करण्याचा इशारा राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिला आहे. दरम्यान, ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर परराज्यातून शहरासह जिल्ह्य़ात अवैध मार्गानी आलेल्या मद्यसाठय़ांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापे घालण्यास सुरुवात केली आहे.

नव्या वर्षांचे स्वागत करण्यासाठी पुण्यासह उपनगरांमध्ये पाटर्य़ाचे आयोजन केले जाते. अशा पाटर्य़ामध्ये सर्रासपणे मद्यसेवन केले जाते. मात्र, पार्टी होणाऱ्या ठिकाणी मद्यविक्रीचा परवाना असेल, तरच मद्यसेवन करता येणार आहे, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर शहरासह जिल्ह्य़ात अनेक ठिकाणी अवैध मार्गाने परराज्यातून देशी-विदेशी मद्य आणले जाते. पिंपरीतील अशोक चित्रपटगृहाच्या मागे विदेशी मद्याचा साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी नागेश मारुती सावंत (वय २८, रा. पिंपरी) याला ताब्यात घेण्यात आले आहे. सावंतकडून साडेसातशे मि. लि क्षमतेचे दहा बॉक्स, १८० मि. लि क्षमतेचे दोन बॉक्स असा एकूण ७० हजार ७२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सरकारमान्य आस्थापनांमधूनच मद्य खरेदी करावी, असे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, व्यावसायिक पाटर्य़ाच्या आयोजनाकरिता एक दिवसासाठी वीस हजार रुपये, तर घरगुती स्वरूपातील पार्टीसाठी दहा हजार रुपये परवाना शुल्क आहे. याकरिता नागरिकांनी उत्पादन शुल्क विभागाकडे अर्ज करून चलन भरावे, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक डॉ. बी. एच. तडवी यांनी केले आहे. विभागाकडून ‘एक्साइज सव्‍‌र्हिसेस डॉट महाऑनलाइन डॉट जीओव्ही डॉट इन’ या संकेतस्थळावर विविध सेवा ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

३१ डिसेंबरसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना

३१ डिसेंबरला अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्या ठिकाणी देखील मद्यविक्री केली जाते. परंतु, मद्य विक्री परवाना असलेल्या आस्थापना वगळून कोठेही, कोणालाही मद्यविक्री करता येणार नाही. मद्यपरवाना नसताना मद्यविक्री केल्याचे आढळून आल्यास संबंधित कार्यक्रमांचा आयोजक आणि संबंधित जागामालक दोघांवरही कारवाई होईल. खुल्या जागेवर पाटर्य़ाचे नियोजन करणे गुन्हा असून अवैध मद्यविक्री, पूर्व परवानगीशिवाय परवान्याशिवाय मद्य वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाची भरारी पथके कार्यरत राहणार आहेत.