पिंपरी : अपुरे मनुष्यबळ, वाहनांची कमतरता आणि इतर सोयीसुविधांचा अभाव असताना शहरातील वाढत चाललेली गुन्हेगारी मोडीत काढण्याचे मोठे आव्हान पिंपरीचे नवे पोलीस संदीप बिष्णोई यांच्यापुढे आहे.

निवृत्तीच्या वाटेवर असलेल्या आर. के. पद्मनाभन यांची शुक्रवारी तडकाफडकी बदली झाली. त्यांना नव्या ठिकाणी रुजू करून घेण्यात आले नाही. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवण्यात येत होते. शनिवारी बिष्णोई यांनी आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली.

ऐन विधानसभा निवडणुकांच्या धामधुमीत बिष्णोई यांना ही जबाबदारी देण्यात आली असून त्यांना बरीच कसरत करावी लागणार आहे. पिंपरीत आयुक्तालयाच्या स्थापनेपासून अपुरे मनुष्यबळ ही पोलीस दलाची समस्या आहे. गुन्ह्य़ांच्या तपासासाठी वाहने मिळत नाहीत, ही मोठी अडचण आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या गटबाजीचा परिणाम पोलीस खात्याच्या कामगिरीवर होत आहे. कामाचा ताण जास्त असल्याने पोलीस कर्मचारी हैराण आहेत. आयुक्तालयाच्या प्रलंबित कामासाठी राज्य सरकारकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याचा अनुभव पद्मनाभन यांनी घेतला. यापुढे त्यात फारसा फरक पडण्याची चिन्हे नाहीत. अशा प्रतिकूल परिस्थितीत नव्या पोलीस आयुक्तांना यापुढे काम करावे लागणार आहे.

दरम्यान, सेवानिवृत्त होत असलेल्या पद्मनाभन यांना पिंपरी पोलीस आयुक्तालयाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून सोमवारी समारंभपूर्वक निरोप देण्यात आला. यावेळी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. वर्षभराच्या कालावधीत पद्मनाभन यांनी चांगली कामगिरी बजावल्याचे सांगत अनेकांनी त्यांचे कौतुक केले. पद्मनाभन यांनी सर्वाविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

संदीप बिष्णोई