पुण्याच्या महापौरपदी अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या चंचला कोद्रे यांची गुरुवारी बहुमताने निवड झाली. कोद्रे यांनी शिवसेनेच्या सोनम झेंडे यांचा ४२ मतांनी पराभव केला. कोद्रे यांना राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीची ८३ मते मिळाली, तर झेंडे यांना युतीची ४१ मते मिळाली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नेहमीप्रमाणे याही निवडणुकीत तटस्थ भूमिका घेतली.
पक्षादेशाप्रमाणे वैशाली बनकर यांनी महापौरपदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी महापालिकेच्या छत्रपती शिवाजीमहाराज सभागृहात ही निवडणूक पार पडली. अप्पर जिल्हाधिकारी गणेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक झाली. काँग्रेसच्या लक्ष्मीताई घोडके यांनीही निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अर्ज मागे घेण्यासाठी देण्यात आलेल्या वेळेत त्यांनी माघार घेतल्यामुळे आघाडीच्या कोद्रे आणि युतीच्या झेंडे यांच्यात निवडणूक झाली.
महापालिकेत राष्ट्रवादीचे ५४, काँग्रेसचे २९, मनसचे २८, भाजपचे २६ आणि शिवसेनेचे १५ सदस्य आहेत. निवडणुकीत आघाडी आणि युतीची मते कामय राहिली. कोद्रे यांना ८३, तर झेंडे यांना ४१ मते मिळाली. मनसेचे सर्व २८ सदस्य तटस्थ राहिले. प्रत्येक सदस्याने प्रभागाचे नाव, स्वत:चे नाव आणि कोणाला मत देत आहे त्याचे नाव जाहीर करून मतदान करण्याच्या पद्धतीनुसार महापौरपदासाठी मतदान झाले.
मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर पाटील यांनी निर्णय जाहीर केला. निर्णय जाहीर होताच आघाडीच्या सदस्यांनी जोरदार घोषणा देत हा विजय साजरा केला. आघाडीच्या नगरसेविकांनी कोद्रे यांना आनंदाने उचलून घेतले. त्या पाठोपाठ राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण, आमदार अनिल भोसले, शरद रणपिसे, बापू पठारे, दीप्ती चवधरी, म्हाडाचे अध्यक्ष अंकुश काकडे, आयुक्त महेश पाठक आणि महापालिकेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन कोद्रे यांचे अभिनंदन केले. सर्वपक्षीय नगरेसवकांनीही कोद्रे यांना शुभेच्छा दिल्या. मोठय़ा संख्येने आलेल्या त्यांच्या कुटुंबीयांनी, नातेवाईकांनी आणि प्रभागातील नागरिकांनी कोद्रे यांना गुच्छ देऊन तसेच पेढे भरवून त्यांचे अभिनंदन केले. या सभेचे कामकाज संपल्यानंतर मोठय़ा संख्येने जमलेल्या कोद्रे यांच्या समर्थकांनी गुलाल उधळत ढोल-ताशा पथकांसह मिरवणूक काढली.
महापौर चंचला कोद्रे यांचे सासरे कैलास कोद्रे हेही तीनवेळा नगरसेवक झाले होते. आपल्या घराण्यात महापौरपद यावे हे त्यांचे स्वप्न होते. ते चंचला कोद्रे यांना मिळालेल्या पदामुळे पूर्ण झाले अशी भावना कोद्रे यांच्या कुटुंबीयांकडून यावेळी व्यक्त होत होती.
पुण्याच्या आठव्या महिला महापौर
चंचला कोद्रे पुण्याच्या आठव्या महिला महापौर असून यापूर्वी कमल व्यवहारे, वत्सला आंदेकर, वंदना चव्हाण, दीप्ती चवधरी, रजनी त्रिभुवन, राजलक्ष्मी भोसले आणि वैशाली बनकर यांना या पदावर काम करण्याची संधी मिळाली.
तरीही मतदान…
काँग्रेसच्या लक्ष्मीताई घोडके नुकत्याच पोटनिवडणुकीत निवडून आल्या असून या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी हे पक्ष आमने-सामने आले होते. मतदान करताना घोडके यांनी ही आठवण सभागृहाला करून देत जरी तुम्ही (राष्ट्रवादी) निवडणुकीत सहकार्य केले नाही, तरीही मी कोद्रे यांना मतदान करत आहे, असे सांगितले आणि दाद मिळवली. तर नगरसेविका अश्विनी कदम यांनी प्रभाग ६७ ची मी प्रतिनिधी असून मला उमेदवारी न दिल्यामुळे सर्व नागरिकांची जी नाराजी आहे ती मी व्यक्त करत आहे, असे सांगून कोद्रे यांना मतदान केले.

Assured support for Arun Gawli daughter for mayor Controversy over Rahul Narvekar statement
अरुण गवळीच्या कन्येला महापौरपदासाठी पाठिंब्याचे आश्वासन; राहुल नार्वेकर यांच्या वक्तव्याने वाद
chagan bhujbal
महायुतीच्या बैठकीत नाशिकचा तिढा सुटेल; छगन भुजबळ यांना विश्वास
Rohit Pawars allegations against Eknath Khadse
रोहित पवार यांचा एकनाथ खडसे यांच्यावर आरोप, म्हणाले, ‘अटकेच्याच भितीने…’
hemant patil
भाजपहट्टापुढे शिंदेसेना हतबल; हिंगोली, यवतमाळचे उमेदवार बदलण्याची नामुष्की